मुंबई : एकीकडे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करत असतानाच दुसरीकडे दिल्लीमध्येही ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जेवणासाठी उपस्थिती लावली. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. पण आम्हाला ऑपरेशन टायगर वगैरे करायची काही गरज नाही, शिंदे साहेबांनी जे काम केलंय ते आता ठाकरे गटातील नेत्यांना पटत आहे असं राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. येत्या काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


ऑपरेशन टायगरची गरज नाही


उदय सामंत म्हणाले की, ऑपरेशन टायगर असं काही नाव नाही. एकनाथ शिंदेंनी गेल्या अडीच वर्षांत जे काही काम केलं होतं ते उशीरा का होईना ठाकरे गटातल्या नेत्यांना समजत आहे. आजच त्याची सुरूवात होत असून राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदेंचा एक दौरा आहे. त्यावेळी आणखी एक माजी आमदार, सहसंपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 


राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, कार्यकर्त्यांना काही सांगायचं ते आम्ही सांगू, कुठेही कटुता येणार नाही याची आम्ही काळजी घेतो.


उद्या कुणी काय जेवायचं हे पक्ष ठरवणार का? 


ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी शिंदेंचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी भोजनासाठी उपस्थिती लावली. त्यावरून आदित्य ठाकरेंनी खासदारांना काही सूचना केल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, "महाराष्ट्रातले राजकारण बाजूला ठेऊन दिल्लीमध्ये गेल्यानंतर राजकीय संस्कृती बाळगली पाहिजे. शिंदे साहेबांकडे जेवायला जायचं नाही आज असं म्हटलं जातं. उद्या काय जेवायचं याची परवानगी घ्यावी लागेल. एखाद्याला श्रीखंड आवडत असेल आणि बासूंदी आवडत नसेल तर त्याला बासूंदी खावी लागेल. एखाद्याला गोड खायला आवडत नसेल तर त्याला पक्षाचा आदेश आल्यानंतर गोड खावं लागेल. पण राजकारणामध्ये हे असं काही होत नाही. ही असुरक्षितता आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ नाही."


किरण सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे त्याची वेगळी कारणं होती. त्यामागे पुण्यातील एक व्यावसायिक संबंधाचा विषय होता असं उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. 


ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी


ठाकरेंच्या खासदारांचं चाललंय काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण राजधानी दिल्लीत घडत असलेल्या काही खळबळजनक घडामोडी हा सवाल उपस्थित करत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदेंचे खासदार  प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे तीन तीन खासदार उपस्थित राहिले होते. बुधवारी रात्री हे स्नेहभोजन नवी दिल्लीत झालं. 


एकीकडे ऑपरेशन टायगरचे वारे वाहात आहेत, दुसरीकडे पवारांनी शिंदेंचा केलेला सत्कार यावरून ठाकरे, संजय राऊत आगपाखड करत असताना ठाकरेंच्या तीन खासदारांची स्नेहभोजनाला उपस्थिती डोळ्यात येणारी होती. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे या स्नेहभोजनाला उपस्थित होते. 


एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. याच सत्कार सोहळ्यावरून शरद पवारांवर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसंच संजय राऊतांनीही आगपाखड केली होती. हे एवढ्यावर थांबत नाही, तर सत्कार सोहळ्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंच्या घरी झालेल्या स्नेहभोजनालाही संजय दिना पाटील उपस्थित होते. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा बळ प्राप्त झालं आहे.


 



ही बातमी वाचा: