मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना महायुतीमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वादाची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारण आहे महामंडळांचं वाटप. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत टप्प्याटप्प्याने महामंडळाचे वाटप सुरू आहे. आमदार सदा सरवणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आमदार संजय शिरसाट यांची आतापर्यंत महामंडळपदी वर्णी लागली आहे. त्याचवेळी अजित पवारांच्या वाट्याला मात्र अद्याप एकही महामंडळ मिळालं नाही हे विशेष. 


शिंदे गटाला टप्प्याटप्प्याने महामंडळ वाटप


शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाचे ट्रस्टी, माजी खासदार हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचं अध्यक्षपद, तर आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हे सर्वजण शिंदे गटाचे नेते आहेत. त्यामध्ये भाजप वा अजित पवारांच्या एकाही नेत्याला महामंडळपदी संधी मिळाली नसल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. 


अजित पवारांच्या नेत्यांना महामंडळ नाही? 


एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना महामंडळाचे वाटप होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवारांच्या वाट्याला काहीच न आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यावर अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा योग्य सन्मान होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला देखील महामंडळ येणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांची 'एबीपी माझा'ला दिली. 


ही बातमी वाचा :