Kalyan Dombivali Municipal Corporation Election : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली मधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतं आहे.  भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डोंबिवलीत भाजपने पालकमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी अशा आशयाचे बॅनर लावले होते. हे बॅनर उतरवल्यानंतर भाजपने शिवसेनेवर दडपशाही करत सत्य लपवत असल्याचा आरोप केला. भाजपकडून सुरू असलेल्या या आरोपांना आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. जो निधी मंजूर झाला नाही तो रद्द कसा होईल, जे टीका करतायत त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही उरले नाही म्हणून आपले कर्म लपवण्यासाठी टीका करत आहेत. त्यांना महत्व देत नाही यंदाच्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल अशी टीका भाजप आमदार रवींद्र चव्हान यांच्यावर शिवसेनेने केली.


कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली मधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतं आहे.  शिवसेना भाजप नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत डोंबिवलीतील विकासकामे शिवसेनेमुळे रखडल्याचा आरोप केला. यावेळी चव्हाण एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील  काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खबळजनक आरोप केला. त्यानंतर डोंबिवलीत पालकमंत्री एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी या आशयाचे बॅनर भाजपच्या वतीने लावण्यात आले. अवघ्या काही तासातच महापालिकेने हे बॅनर उतरवले. त्यामुळे भाजप पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जनतेपासून सत्य लपवण्यासाठी शिवसेनेने दडपशाहीचा वापर केल्याचा आरोप केला. आज शिवसेनेच्या डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम , युवा सेना कल्याण जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे ,ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी आमदार चव्हाण यांनी केलेल्या आरोपांचा निषेध व्यक्त केला .पालकमंत्री एकनाथ शिंदे  हे कल्याण-डोंबिवलीच्या तारणहार आहेत ,त्यांनी कल्याण-डोंबिवली साठी 1900 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संगीतले.


जे टीका करतायत त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही उरल नाही म्हणून आपले कर्म लपवण्यासाठी टीका करत आहेत , यंदाच्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल असा टोला आमदार चव्हान याना शिवसेनेने लगावला. फक्त डीपीआर मंजूर झाला पुढील कोणतीही कारवाई झाली नाही ,निवडणुकीत उशिरा आलेली जाग होती ,समोर येऊन पुरावे दाखवावेत ,जो निधी मंजूर झाला नाही तो रद्द कसा होईल असा सवालही उपस्थित केला. त्यांनी दाखवलं ते लोकांनी पाहावं अशी भाजपची सवय असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.