मुंबई : शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली आहे. शिवसेना भवनात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. 2014 मध्येही शिवसेना आमदारांनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केला होता.
आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर पाच आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. तर शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी सुनील प्रभूंची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान बैठकीनंतर ओला दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत.
याआधी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विधीमंडळ नेतेपद स्वीकारणार का याकडे लक्ष होतं. पण आता एकनाथ शिंदे यांचंच नाव निश्चित झालं.
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर चर्चा फिसकटली : उद्धव ठाकरे
तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. खूप काही अफवा सुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मीडियाच्या माध्यमातूम काही प्रस्ताव सुरु आहेत. आपण मित्रपक्षाला शत्रू पक्ष मानत नाही. माझं जे अमित शाहांबरोबर ठरलंय ते करावं, आम्ही स्थिर सरकार देऊ. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी अनौपचारिक गप्पांमध्ये
असं वक्तव्य करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिसकटली आहे, पण मला खात्री आहे सगळं सुरळीत होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.