मुंबई: एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी दोषमुक्तीचा अर्ज सादर केला आहे. एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी हा अर्ज गुरूवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सादर केला. याची दखल घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ईडीला या दोषमुक्तीच्या अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश जारी केले आहेत. 


या प्रकरणी खडसेंचे जावई गिरीष चौधरी यांनी जवळपास दोन वर्षांचा कारावास भोगला आहे. जुलै 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला होता. तर एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे सध्या जामीनावर आहेत. युती सरकारमध्ये मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत एकनाथ खडसेंनी भोसरी एमआयडीसीतील जमीन कवडीमोल दरात विकत घेतल्याचा आरोप आहे.


ईडीकडून एक हजार पत्रांचे आरोपपत्र


खडसे कुटुंबीयांविरोधात ईडीकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. साल 2016 मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीनं खडसेंना क्लीन चीट दिलेली आहे.


काय आहे प्रकरण? (Bhosri MIDC Money Laundring Case) 


एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. 


या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. 


ही बातमी वाचा :