मुंबई : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून विधानपरिषदेच्या 4 जागांसाठीही मतदान पार पडले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसून महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. तर, महायुतीला केवल 17 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे, आपल्या पराभवाची कारणमिमांसा करताना भाजपने (BJP) मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्दयांवरही मंथन केलं आहे. तसेच, मराठवाड्यात बसलेल्या राजकीय पराभवावर मार्ग काढण्याच्या हालचाली आता भाजपकडून सुरू झाल्याचं दिसून येत आहे. कारण, आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून 11 नावांची चर्चा सुरू असून या विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) जागेसाठी पंकजा मुंडेंनाही (Pankaja Munde) संधी मिळण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष ऑक्टोबर महिन्यात घोषित होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, जालन्यातील पराभूत उमेदवार रावसाहेब दानवे आणि परभणीतील पराभूत उमेदवार महादेव जानकर यांच्या नावाची विधानपरिषदेच्या जागांसाठी चर्चा सुरू आहे. 


पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होणार?


भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा सुरू असून ओबीसी, मराठा आणि धनगर समाजाला खुश करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि महादेव जानकर यांना संधी मिळणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकांपूर्वीच विधानपरिषदेत संधीत देऊन जातीय समीकरणं जुळवण्याचं काम भाजपकडून होणार आहे. त्यामुळे, गेल्या 5 वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकजा मुंडेंचा लवकरच विधिमंडळात सदस्य म्हणून समावेश केला जाऊ शकतो. तर, सातत्याने नाराजी दर्शवणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांना गुलाल उधण्याची संधी मिळू शकते.  


11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर


दरम्यान, विधान परिषदेचे 11 सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे, विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून विधानपरिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुकता राजकीय नेत्यांसह समर्थकांनाही लागली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधानपरिषदेतील 11 आमदारांची निवड करणार आहेत. त्यासाठी, 25 जूनपासून 2 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर, 5 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. 12 जुलै रोजी रोजी मतदान होणार असून 12 जुलै रोजीच निकाला जाहीर होणार आहे. त्यामुळे, 12 जुलै रोजी चित्र स्पष्ट होईल.