मुंबई: राज्यभर आज सर्वत्र मुस्लिम बांधवाची बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अधा (Eid al-Adha 2023) साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी मुस्लिम समूदायाने सामूहिक नमाज पठण केलं. आज ईद सोबतच आषाढी एकादशी आल्याने अनेक ठिकाणी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता. 


राज्यात आज हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळालं. भुसावळ शहरातील नवीन ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद उल अधाची नमाज सकाळी साडेआठ वाजता अदा केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी देशात जातीय सलोखा एकात्मता अखंड राहो तसेच भरपूर प्रमाणात पाऊस होऊन देशात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली. 


नाशिकच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशद्वारवर पिशवीत साहित्य घेऊन येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली. ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव दरवर्षी एकत्र येतात. 


बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व


बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. या कुर्बानीनंतर जे मांस मिळतं त्याचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वतःसाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येतो. कुर्बानी तीन भागांत व्यवस्थित वाटल्यानंतरच वैध मानली जाते.