मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला, मात्र पेरण्या केल्यानंतर ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकटओढवलं आहे. हवामान बदलामुळे शेतीवर विपरित परिणाम होत असल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे. ज्यात सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभऱ्यासारख्या पिकाचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजने हा अहवाल मांडला आहे.
जुलै महिन्यात धो-धो पाऊस पडतो, मात्र, प्रत्यक्ष पावसाच्या दिवसांत घट आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून पेरणीची लगबग सुरू केली होती. पाऊस वेळेवर येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाअभावी तालुक्यातील पिके सुकण्यास, करपण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील काही भाग अवर्षणग्रस्त स्थितीत आहे, असं अहवालात मांडण्यात आलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, नांदेड, धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या पर्जन्यमानआणि तापमान यांच्या आकडेवारीचे 30 वर्षाचे परीक्षण यामध्ये करण्यात आले आहे. त्याचसोबत 2050 वर्षांपर्यंतचे पूर्वनुमानही यात लावण्यात आले आहेत.
उशिरा सुरू होणारा पावसाळा, अधूनमधून पडणारा दुष्काळ आणि पाऊस यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. तसेच हरभरा लागवडीत शेंगा भरण्याच्या दरम्यान तापमानात अचानक वाढ दिसून येईल. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज ह्या अभ्यासात वर्तवण्यात आल्याचं रिसर्चर रोमित सेन सांगतात.
आज पाऊस आणि उद्या ऊन अशामुळे पिकांवर परिणाम होतो आहे. खरीपाच्या मधोमध पडणाऱ्या मुसळधारेमुळे बुरशीजन्य रोग, कीटकांचा धोका संभवतो. अशात अचूक माहिती देणारी अॅग्रो वेदर स्टेशन जिल्ह्यात असली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊशकतो. वेदर स्टेशनच्या मार्फत पेरणी कधी करायची या विषयीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर किती प्रमाणात करावा याविषयी देखील शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असा हा अभ्यास सांगतो.
‘हवामान बदलाचा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून त्यात सातत्याने यामध्ये वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. यापुढे परिणामआणखी भीषण रूप धारण करतील आणि त्यातून अन्नसुरक्षा धोक्यात येईल. हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतीमधून शाश्वत उत्पन्नासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा धान्यासाठी दुस-या देशातून आयातीसाठी हात पसरावे लागतील’, अशी भीतीशेती अभ्यासक दीपक चव्हाण व्यक्त करतात.