रत्नागिरी : हापूस! कोकणचा राजा. जगाच्या बाजारपेठेत देखील हापूसला मोठी मागणी आहे. शिवाय, खवय्यांना देखील उन्हाळ्याची चाहुल लागताच हापूसची चव चाखण्याची आतुरता असते. पण, यंदा नैसर्गिक संकटांमुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्यानं अद्याप देखील अपेक्षित प्रमाणात हापूस बाजारपेठेत दाखल झालेला नाही. लांबलेला पाऊस, थंडीचं कमी प्रमाण, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला. हे नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय वाढत्या उष्णतेचा परिणाम आता हापूसवर झाला आहे. 


कोकणात सध्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पारा अगदी 42 डिग्री अंश सेल्सिअसवर देखील पोहोचलेला पाहायाला मिळाला. त्याचा परिणाम हा हापूस आंब्यावर होताना दिसत आहे. वाढत्या तापमानाचा दाह हापूसला सहन होत नाही. त्यामुळे आंबा आतून सुका होत आहे. काही ठिकाणी त्याला आंबा लासा होणे असं देखील म्हणतात. सध्याची सारी परिस्थिती पाहता आंबा बागायतदार आणि शेतकरी देखील पुरते हवालदिल झाले आहेत. यावर उपाय देखील काही नसल्यानं कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. 


कैरी, छोट्या फळांना देखील फटका


इतकंच नाही तर कैरी किंवा हापूसच्या छोट्या फळांवर देखील वाढत्या तापमानाचा परिणाम होताना दिसत आहे. वाढलेल्या तापमानामुळे फळं गळून पडत आहेत. परिणामी यातून सावरायचं तरी कसं? असा प्रश्न कोकणातील शेतकऱ्यांना पडला आहे.


उरली-सुरली आशा देखील संपण्याची भीती


वातावरणातील वारंवार झालेल्या बदलांमुळे यापूर्वी आंब्यावर होणारा फवारणीचा खर्च हा चार पटीनं वाढला. त्यात आता वाढत्या उष्णतेचा फटका तोडणी योग्य फळांना बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक गणितं देखील कोसळत असल्याचं दिसून येत आहे. यंदा सारखं वातावरण किमान आम्ही मागील 60 ते 70 वर्षात तरी आम्ही पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया जूने-जाणते हापूस आंबा उत्पादक शेतकरी देतात. त्यावरून यंदा हापूससमोर आलेल्या नैसर्गिक संकटांचा किमान अंदाज आपल्याला नक्कीच बांधता येईल. 


हापूसच्या नावानं कर्नाटक आंब्याची विक्री


सध्या राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये हापूसच्या नावानं कर्नाटकी आंब्याची विक्री होताना दिसत आहे. कर्नाटकी आंबा दिसायला हापूसप्रमाणेच असल्यानं ग्राहकांची देखील फसवणूक होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी हापूस खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन कोकणातील शेतकरी करत आहे.