अहमदनगर : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख इतकी असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे. त्यामुळं अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे.
महाविकास आघाडीतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.
राज्य सरकारमधील 12 पेक्षा जास्त मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे. तर अनिल देशमुख काही महिन्यापासून अटकेत आहे. अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांमागे सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू आहे. त्यात आता प्राजक्त तनपुरेंचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Jayant Patil : जाणून बुजून दाऊदशी संबंध जोडून नवाब मलिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न, जयंत पाटील यांचे टीकास्त्र
कोण होणार गोंदियाचा नवीन पालकमंत्री? गोंदियाचे पालकमंत्री अन् ईडीचा ससेमिरा हे समीकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha