पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात महिनाभरापासून भूकंपाचे लहान- मोठे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-3 मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच भूकंपाचे धक्के बसल्याने पाहणीसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक येत्या 11 ते 13 डिसेंबर रोजी दरम्यान या भागाचा दौरा करणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असले, तरी ग्रामीण डोंगरी भागात साधी घरे असल्याने एखादा मोठा धक्का बसल्यास या संपूर्ण भागाला मोठा धोका संभवतो.
दिवाळीनंतर 1100 विद्यार्थी भीतीपोटी शाळेत परतलेच नाहीत
यंदा 11 नोव्हेंबरला डहाणू, धुंदलवाडी भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 4 डिसेंबर व 8 डिसेंबर असे 2.9 ते 3.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे धक्के या भागात बसले. याखेरीज या संपूर्ण परिसरात या दरम्यान अनेक सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के वारंवार बसल्याने डहाणू तालुक्यातील पूर्वेकडील बहुतांश रहिवाशांनी स्थलांतर केले आहे. या परिसरामध्ये अजूनही वास्तव्यास असलेले लोक रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेत तात्पुरत्या झोपड्यांमध्ये रात्र जागून काढतात. धुंदलवाडी आश्रमशाळेतील 700 निवासी विद्यार्थी, तसेच चिंचले आश्रमशाळेतील 400 विद्यार्थी दिवाळीनंतर भूकंपाच्या भीतीपोटी शाळेत परतलेच नाहीत.
भूकंपमापन यंत्र बसवणार
डहाणू परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर आमदार मनीषा चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे यासंदर्भात पत्र लिहिले होते. या अनुषंगाने तज्ज्ञांचे पथक पालघरमध्ये पाठविण्यात येणार आहे. या पथकामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ असतील, तसेच भूकंपाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी यंत्रसामुग्री आणण्यात येणार आहे. या यंत्रसामुग्रीसाठी सुरक्षित जागेची व्यवस्था करण्याचे तसेच त्याकरिता लागणारे संगणक व इंटरनेटची सुविधा पुरवण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली आहे. या पथकाकडून धुंदलवाडी परिसरामध्ये भूकंपमापन यंत्र बसवण्यात येणार आहे.
धरणांशी संबंध?
या भागात स्वातंत्र्योत्तर काळात 25 डिसेंबर 2017 आणि जव्हार तालुक्यात वाळवंडा भागामध्ये 2 जानेवारी 2018 रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यानंतर त्याठिकाणी भूकंप मापन यंत्र बसवण्यात आले होते. डहाणू भागात अचानक सुरू झालेली भूगर्भातील हालचाल ही रहिवाशांसाठी चिंतेची बाब आहे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी दमणगंगा खोरे, वैतरणा खोऱ्यांतर्गत जिल्ह्यात अनेक लहान – मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून खोऱ्यात 20 ते 25 नवीन पाटबंधारे प्रकल्प प्रस्तावित आहेत. पालघर जिल्ह्यात सध्या 77 पाटबंधारे प्रकल्प कार्यरत, तर 77 प्रकल्पांची कामे सुरू असून 77 पाटबंधारे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
सध्या बसणाऱ्या धक्क्यांचा केंद्रबिंदू डहाणू शहरापासून सुमारे सात किलोमीटरवर आहे. त्यापासून दापचरी दुग्ध प्रकल्पातील कुर्झे (तलासरी) धरण 18 किलोमीटरवर, सूर्या प्रकल्पातील कवडास 23 किलोमीटर, तर धामणी धरण 30 किलोमीटरवर आहे. त्यांच्यातील पाणीसाठ्याचा भूकंपाच्या धक्क्यांशी संबंध आहे का? हा सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे.
प्रकल्पांची सुरक्षितता
सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेले सर्व पूल, शासकीय इमारती या भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञानचा अंतर्भाव करण्यात येत असून या सर्व इमारती भूकंप प्रवण क्षेत्र प्रवर्ग- ३ च्या अनुरूपाने बांधण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तारापूर अणुऊर्जा केंद्राचे बांधकाम भूकंपाचे सौम्य व मध्यम धक्के सहन करण्याइतपत सुरक्षित असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, याविषयी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील जनसंपर्क अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास नकार दिला.
नागरी वसाहतींची सुरक्षा
डहाणू तालुक्यासह पालघर, वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती व संकुले असून 2010 पासून इमारतींची रचना भूकंप प्रवण क्षेत्र - 3 अनुषंगाने करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी झालेली बांधकामे भूकंपाच्या मोठ्या व मध्यम धक्क्याने किती सुरक्षित राहतील याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दशकात झपाट्याने रहिवासी संकुले उभी राहिली. पण, त्यांना बांधकाम लेखापरीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे त्यांच्या दर्जाविषयी शंका आहे. अनेक इमारतींच्या बांधकाम आराखड्यात बदलही केले आहेत. रेती उत्खननावर अनेक वर्षांपासून बंदी असल्याने नैसर्गिक रेतीऐवजी कृत्रिम रेती, खडीची भुकटी (ग्रीट)चा वापर बांधकामात होत आहे. भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे डहाणू परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के गेल्या काही दिवसांपासून बसत आहेत.
भीतीचे वातावरण पसरू नये यासाठी प्रयत्न : जिल्हाधिकारी
उपविभागीय अधिकाऱ्यांसह सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी हे गाव पातळीवर जाऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. जनजागृती करून आपत्कालीन कार्यवाहीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. डहाणू भागात काही रुग्णवाहिका तनात ठेवल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले आहे.
प्रकल्प त्वरित रद्द करावेत : प्रा. भूषण भोईर, पर्यावरणवादी
भूकंपाचे केंद्र बिंदू तपासता असे लक्षात येते की ते धरणाकडेला आहेत. भविष्यात पालघर ‘नवनगर’ शहर विकसित करण्यात आले किंवा मुंबई मेट्रोपोलिटन रिजन (एमएमआर)चे क्षेत्र पालघर तालुक्यापर्यंत विस्तारित केल्यास आणखी धरणे बांधायला लागतील. डोंगर फोडून पायाभूत सुविधा आणि बांधकामे केली जातील. भूकंपाच्या अलिकडे घडलेल्या घटनांवरून शासनाने बोध घेऊन सर्व प्रकल्प त्वरित रद्द करावेत, अन्यथा त्याचा परिणाम स्थानिकांना भोगावा लागेल, असे पर्यावरणवादी प्रा. भूषण भोईर यांनी म्हटले आहे.
भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर जिल्हा जेरीस, नागरिक धास्तावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Dec 2018 01:04 PM (IST)
स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच भूकंपाचे धक्के बसल्याने पाहणीसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक येत्या 11 ते 13 डिसेंबर दरम्यान या भागाचा दौरा करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -