LIVE UPDATE :
- अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान
- अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी दीड वाजेपर्यंत अंदाजे 34 टक्के मतदान झाले आहे.
- अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या ड्युटीवर असताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशोक सुर्यवंशी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सावेडी प्रभागाच्या मतदान केंद्रावर प्रकृती बरी नसल्याने सुर्यवंशी झोपले होते. झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10:30 पर्यंत 11 टक्के मतदान झाले आहे.
महापालिका निवडणूक : मतदानाला सुरुवात, शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ल्याने तणाव
अहमदनगर महापालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सागर थोरात असं या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागरवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
मात्र या प्रकरणामागे भाजपचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीला जनता निवडून देणार असल्यानेच शिवसेनेच्या पायाखालची जमीन घसरल्याने शिवसेना असे आरोप करत असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. ऐन निवडणुकीच्या मतदानाआधी ही घटना घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये 351 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत 2 लाख 56 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र असून त्यातील 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.
निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षकांसह 2 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून 2 हजार निवडणूक कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणिकीच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व म्हणजे 68 जागांवर आपले उमेदवार दिले आहे. विशेष म्हणजे यात 35 महिला उमेदवार भाजपने दिल्या आहेत. तर शिवसेनेने 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने 46 तर कॉंग्रेसने 21 उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहेत.
अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता. विशेष म्हणजे आजपर्यंत कुठल्याही पक्षाने 5 वर्षे महापालिकेवर सत्ता केलेली नाही. अडीच वर्षाच्या टर्मनंतर महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली आहे.
या निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार हे पाहावे लागणार आहे.
श्रीपाद छिंदमच्या भावाने ईव्हीएम मशीनची पूजा केली
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमच्या भावाने चक्क मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा केली आहे. श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम याने सकाळी ईव्हीएम मशीनची विधीवत पूजा केली. श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मात्र त्याला तडीपार करण्यात आले आहे.
वॉर्ड क्रमांक 9 मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केली. यामुळे अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या कृत्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न : खासदार दिलीप गांधी
यावर बोलताना हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असं म्हणून भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नाला बगल दिली आहे. काल शिवसेना कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी नगरच्या राजकारणाला वेगळे वळण देण्यासाठी असे आरोप भाजपवर केले जात आहेत, असंही यावेळी गांधी म्हणाले.
दरम्यान, राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले आहे. त्यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरु आहे.