महाबळेश्वर : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, त्याचं तोक्ते चक्रीवादळात झालेलं रुपांतर त्यामुळं कोकण किनारपट्टीसह राज्यातील बहुतांश भागात याचे परिणाम दिसून आले. कुठे सोसाट्याचा वारा, तर कुठे मुसळधार पाऊस, चक्रीवादळानं काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. पण, तिथे महाराष्ट्राच्याच दुसऱ्या भागात मात्र चक्रीवादळामुळे वेगळेच परिणाम दिसून आले. 


राज्यातील अतिशय लोकप्रिय अशा महाबळेश्वर गिरीस्थानाचं रुपडं या तोक्ते चक्रीवादळानं जणू पालटलं आहे. महाबळेश्वर येथे असणाऱ्या अनेक नयनरम्य ठिकाणांवरुन दऱ्याखोऱ्यांना पाहणं जणू परवणीच ठरत आहे. आर्थर सीटपासून इतर सर्वच पॉईंटला पोहोचलं असता तेथून डोंगररांगा, त्यांतून घोंगावणारा वारा कणखर महाराष्ट्राचं एक अनोखं रुप आपल्याला दाखवत आहेत. 


कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील पर्यटनस्थळं बंद असली, तरीही महाबळेश्वरची ही दृश्य नकळत मनाला सुखावह अनुभूती देणारी ठरत आहे. इथल्या हवेत कमालीचा गारवा आला असून, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इथल्या डोंगररांगांवर धुक्याची चादर दिसत आहे. तर, आभाळाच्याही वेगळ्या छटा पाहायला मिळत आहेत. 
एरव्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इथल्या डोंगररांगांचं काहीसं राकट स्वरुप दिसतं. पण, तोक्ते चक्रीवादळामुळे मात्र यंदाच्या वर्षी चित्र काहीसं पालटलं आहे. 






Cyclone Tauktae : जाणून घ्या कुठवर पोहोचलंय तोक्ते चक्रीवादळ


मागील कित्येक महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊन परिस्थितीमुळे अनेक पर्यटनप्रेमींनी त्यांच्या या आवडीला वेसण घातलं आहे. पण, हीच सध्याच्या काळाची गरज ठरत आहे. या कठीण प्रसंगातच नियमांचं पालन केल्यास भविष्यात महाबळेश्वर आणि अशा कित्येक ठिकाणांवर प्रत्यक्ष जाऊन त्यांचा मनमुराद आनंद घेणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळं महाबळेश्वरची ही व्हरच्युअल सफर अनुभवत घरीच राहा, सुरक्षित राहा !