रत्नागिरी : तोक्ते चक्रवादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेल्या 33 के व्ही वीज वाहिनीचा धक्का बसून पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बोरज जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सोमवारी (17 मे) संध्याकाळी ही घटना घडली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.


बोरज घोसाळकरवाडी इथले प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दुचाकीवरुन लोटे इथे गेले होते. लोटे इथलं काम संपवून ते संध्याकाळी परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. बोरज जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आले असता, तोक्ते वादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेला 33 के व्ही वीज वाहिनीचा जोरदार झटका दोघांना बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


रत्नागिरीत पंचनाम्याचं काम सुरु
दरम्यान तोक्ते गुजरातमध्ये धडकलं असलं तर त्याच्या मार्गात असलेल्या महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांचं मोठं झालं. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळानंतर पंचनाम्याचं काम सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सरासरी 132.11  मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली. 


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या नुकसानीच्या (दुपारी 12 पर्यंत) माहितीनुसार, मंडणगड तालुक्यात 200 घरांचं, दापोलीत 350 घरं, खेडमध्ये 30 घरांचं, गुहागर 05 घरं, चिपळूण 65 घरं, संगमेश्वर 102 घरं, रत्नागिरी 200 घरं, राजापूर 32 असे जिल्ह्यातील एकूण 1028 घरांचं नुकसान झालं. तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर इथे 1, संगमेश्वर इथे 1, रत्नागिरीमध्ये 3 आणि राजापूरमध्ये 3 असे एकूण 8 जण जखमी झाले आहेत. गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरमध्ये 1 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या अशी 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकानं आणि टपऱ्यांचे, 9 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचं नुकसान झालं आहे. 


संबंधित बातम्या