लातूर: ज्या धरणाला कोरड पडली म्हणून लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, त्याच मांजरा धरणाच्या पाण्याने मृत साठा गाठल्याने चिंता वाढली आहे. लातूरमध्ये आता दहा दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. लातूरच्या महापालिका आयुक्तांनी लातूर शहरात घरे, मोटारगाड्या आणि परिसर साफ करण्यासाठी पाण्याच्या वापरावर बंदी घातली. अशा पाण्याचा वापर करताना कोणी आढळून आल्यास महापालिका कायदेशीर कारवाई करणार आहे. शहरातल्या सर्व नळांना तोट्या बसवून घेण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न पाळल्यास महापालिका कारवाई करणार आहे. मराठवाड्याची भिस्त परतीच्या मान्सून पावसावर जास्त आवलंबून असते. त्यामुळे जर आता परतीच्या मान्सूनने दगा दिला, तर  पुन्हा दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे.




2016 नंतर धनेगावच्या मांजरा धरणात चांगला पाणीसाठा होता. आता मात्र 224 दलघमी क्षमता असलेल्या धरणात उपयुक्त साठा संपला असून, आता केवळ 45 दलघमी पाणी शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असल्याने, आता धरणाचा उपयुक्त साठा संपला आहे. कृषी आणि उद्योगाला पुरवणाऱ्या पाण्यासंदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

लातूर एमआयडीसीसोबतच ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा पट्ट्यातील शेतीसाठी एकमेव आधार असलेल्या या पाण्याच्या वापरावरही प्रशचिन्ह निर्माण झालं आहे.

लातूर जिल्ह्यातून 127 किलोमीटरचा प्रवास करणारी मांजरा नदी, नदीवरचं मांजरा धरण लातूरसाठी जीवनदायिनी आहे. नदीवर अनेक ठिकाणी बांध आहेत.  दुष्काळात महाराष्ट्राने मिळून जलयुक्तची केलीत. पण आता या धरणाने मृतसाठा गाठला आहे.  मृतसाठ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, पण उद्योग आणि शेतीचं पाणी पूर्णत: बंद करावं लागेल. 

मिरजहून पाणी एक्स्प्रेस लातुरात

दोन वर्षांपूर्वी सांगलीतील मिरजेतून पाणी घेऊन वॉटर एक्स्प्रेस लातूरला रवाना झाली होती. दुष्काळानं त्रस्त झालेल्या लातुरकरांसाठी सांगलीने मदतीचा हात दिला होता. पाण्याची मिरज एक्सप्रेस  लातुरात दाखल झाली होती. पाण्याचे 10 वॅगन्स या एक्सप्रेसला जोडण्यात आले होते. एका वॅगनमधून साधारणपणे 50 हजार लिटर पाणी नेण्यात आलं होतं. त्यामुळे पहिल्या खेपेला लातूरकरांना तब्बल 5 लाख लीटर पाणी मिळालं. अशा शेकडो रेल्वे गाड्या मिरजेतून लातूरला रवाना झाल्या होत्या. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली होती.

संबंधित बातम्या 

मिरज ते लातूर पाणी एक्स्प्रेसचा प्रवास कसा होता?  

ना थांबा, ना क्रॉसिंग, 8 तासात पाणी एक्स्प्रेस लातुरात?  

लातूरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल