यवतमाळ : नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणणेल्या हत्तीने अक्षरश: हैदोस घातला. या बेफाम हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अर्चना कुलसंगे (गाव-चहाद) असं मृत महिलेचं नावं असून पोहना गावातील नामदेव सवई असं जखमी व्यक्तीचं नाव आहे.
वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला आहे. तिला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी हत्तीला आणलं. परंतु रात्री बेफाम झालेला हत्ती लोखंडी साखळी तोडून नासधूस करत कॅम्पपासून 15 किमी अंतरावर असलेल्या चहाद गावात पोहोचला. इथे शौचास गेलेल्या एका महिलेला हत्तीने पायदळी तुडवलं, ज्यात तिचा मृत्यू झाला. त्यानतंर हत्ती पोहना गावात गेले, तिथे त्याच्या हल्ल्या एक जण जखमी झाला. त्याला उपचारांसाठी वर्ध्यातील वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हैदोस घालत हत्ती वर्धा जिल्ह्यात पोहोचला. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिपरी शिवारात वनअधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर त्याला पकडलं. हत्ती पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी या हत्तीला काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातून आणलं होतं.