अकोला : अजय देवगनच्या गाजलेल्या 'दृष्यम्' चित्रपटाप्रमाणे हत्या घडल्याचं अकोल्यात समोर आलं आहे. पुजारी म्हणून काम करणाऱ्या आरोपीने मित्राची हत्या करुन त्याचा मृतदेह मंदिर परिसरात पुरला. सेल्फी काढण्यासाठी दिलेला देशी कट्टा परत न दिल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप आहे.


अकोल्यात राहणाऱ्या आकाश तुपे या तरुणाची 'दृष्यम्' स्टाईल हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी आकाशचा मित्र विठ्ठल सुखदेव भारती याला अहमदाबादमधून अटक केली. विशेष म्हणजे आरोपी भारती हा एका मंदिरात पुजारी म्हणून काम करतो.

आकाश महिनाभरापासून बेपत्ता होता. तो 9 सप्टेंबरच्या रात्री दहा वाजता दुकान बंद करुन घराकडे निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला न आल्याने नातेवाईकांनी आकाश बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिसात नोंदवली होती.

पोलिसांना तपासादरम्यान 15 सप्टेंबरला शास्त्रीनगर परिसरातील एका मंदिराच्या शौचालयाच्या टाकीत बेपत्ता आकाशची चप्पल आढळून आली. त्या आधारे पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल भारतीभोवती तपास केंद्रीत केला. भारतीही 9 सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याचं समोर आल्याने पोलिसांचा संशय बळावला.

आकाशची हत्या 9 सप्टेंबरला रात्री केल्यात्यानंतर मृतदेह शास्त्रीनगर परिसरातील मंदिराच्या आवारात जमिनीत गाडून ठेवल्याची कबुली आरोपी भारतीने दिली. सेल्फी काढण्यासाठी दिलेला देशी कट्टा आकाशने परत न दिल्यामुळे त्याने मित्राचाच जीव घेतला. पोलिसांनी सोमवारी मंदिर परिसर खोदून आकाशाचा मृतदेह बाहेर काढला.