सुप्रिया सुळे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये त्या कदम कुटुंबीयांकडे चहा घेण्यास गेल्या होत्या. औरंगाबादकरांना सध्या लोडशेडिंगचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे. सुप्रिया सुळे कदम कुटुंबीयांकडे गेल्या असताना, तिथे लाईट नव्हती. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर अंधारातच शुटिंग करुन, औरंगाबादमधील भारनियमनाची स्थिती सांगितली.
“दिवसभर लाईट नाही, लोडशेडिंग सुरु आहे. सर्वत्र अंधार आहे, औरंगाबाद अंधारात आहे. मुख्यमंत्री साहेब काही तरी करा. खरंच आमचे अच्छे दिन आले अंधारात” , असं म्हणत सुप्रिया सुळेंनी व्हिडीओद्वारे सरकारवर निशाणा साधला.
राज्यात भारनियमनाचं संकट
ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाचं संकट आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने, तात्पुरत्या स्वरुपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. सध्या राज्यात 400 ते 500 मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे. इतर राज्यांनी अधिकच्या किंमतीने वीज विकत घेतली आहे,त्यामुळे वीज उपलब्ध नाही. परिणामी लोडशेडिंग सुरु झालं आहे. ठाण्याजवळ मुंब्रा, दिवा भागात चार तास लोडशेडिंग आहे. G1, G2 आणि G3 या तीन गटात 3 ते 4 तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक या परिसरात लोडशेडिंग होत आहे. ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ आहे. त्यामुळे त्याप्रमाणात वीजनिर्मिती होत नसल्याने आता भारनियमन लागू झालं आहे.
संबंधित बातम्या
लोडशेडिंग सुरु, तोडफोड झाल्यास प्रशासन जबाबदार, आव्हाड आक्रमक