Ajit Pawar : मी दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांचीही भाषणे ऐकली. मात्र, काहींची भाषणं नको तितकी लांबली असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. आता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला हवा. आपली पुढची भूमिका काय असायला हवी. कोणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कोणाची मुळ शिवसेना आहे, याबाबत विचार करावा असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. काहींची भाषण नको तितकी लांबल्याचे अजित पवार म्हणाले. कोणाची लांबली त्याचा विचार आता तुम्हीच करा असेही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका असेही अजित पवार म्हणाले.
10 कोटी रुपये खर्चून बसेसची व्यवस्था केली, मात्र सर्वसामान्य लोकांना एसटी मिळाली नाही
दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्चून बसेसची व्यवस्था केली होती. परंतू, त्यामुळं सर्वसामान्य लोकांना एसटी मिळाली नाही असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. दोन्हीकडील दसऱ्या मेळाव्याला गर्दी होती. ती कशी होती काय होती असेही अजित पवार म्हणाले. झेंडा शिवसेनेचा मात्र, अजेंडा राष्ट्रवादीचा असल्याची टीका शिंदे गटाने केली होती. यावर अजित पवार म्हणाले की, मंत्रीमंडळात असताना एकनाथ शिंदे यावर कधी बोलले नाहीत. ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे. आम्हाला अनेक वर्ष विविध पक्ष सोबत घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 1999, 2004, 2009 आणि 2019 ला देखील अनेक पक्षाचे सरकार चालवले आहे असे अजित पवार म्हणाले. आत्तापर्यंतचे निर्णय सर्वांनी मिळून घेतल्याचे अजित पवार म्हणाले. शिंदे गटाची वक्तव्य ही राजकीय स्वरुपाची असल्याचे पवार म्हणाले.
वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा
वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली म्हणून तो प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका महाविकास आघाडीवर होत आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. हे अत्यंत चुकीचं आहे. हे सिद्ध करुन दाखवावे असं आव्हान देखील अजित पवार यांनी यावेळी दिलं. वेदांचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष आपल्यावर येईल, त्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. यामध्ये काँग्रेसने आधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर : एकनाथ शिंदे
- Dasara Melava 2022 : गुलाबराव पाटलांनी भाषणात 'तो' उल्लेख केला अन् एकनाथ शिंदे भावूक झाले...