Dr. Pradip Kurulkar Spy Case:  भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या एटीएसच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) यांच्यासह भारतीय हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. निखील शेंडे (Nikhil Shende) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. निखील शेंडे हे बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. 


आरोपी डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) याची आज एटीएस कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने कुरुलकरांना मंगळवारपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर याच्यासह निखिल शेंडे हे भारतीय वायुदलातील अधिकारीही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पाकिस्तानातील ज्या आयपी अॅड्रेसवरुन डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता, त्याच आयपी अॅड्रेसचा उपयोग निखिल शेंडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. 


निखिल शेंडे यांचा याबाबतीत एटीएसने जबाब नोंद केला असून एअर फोर्सकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी यंत्रणा कुरुलकरच्या माध्यमातून इतर अधिकाऱ्यांनादेखील 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न झाले का, इतर कोणते अधिकारी या कटात अडकले, याचाही तपास सुरू आहे. 
 


कुरुलकरकडून चार मोबाईल फोनचा वापर 


डीआरडीओचे अधिकारी असलेले आरोपी प्रदीप कुरुलकरकडून चार मोबाईल फोनचा वापर सुरू होता. त्यापैकी एका मोबाईलचे लॉक उघडले जात नव्हते.  फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तो मोबाईल दिल्यानंतर देखील तो उघडण्यात अपयश येत होतं. अखेर कुरुलकरने आज स्वतः तो मोबाईल सुरू करुन दिला. या मोबाईलमधे जो डाटा सापडला आहे, त्याचा तपास ए टी एस कडून करण्यात येणार आहे. 



प्रदीप कुरुलकरवर नेमका आरोप काय?


डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं होतं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला. 



या संवादादरम्यान डॉ. प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली. त्याचबरोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: