चंद्रपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. डॉ शीतल आमटे यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल निष्कर्ष काढता येईल अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे.
फॉरेन्सिक टीम या घटनेचा सखोल तपास करत आहे. आम्ही आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. जशी जशी तपासात माहिती समोर येईल आम्ही माहिती देऊ असे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे म्हणाले. दरम्यान, सुसाईड नोट मिळाली का? घटने वेळी घरी कोण कोण होते? डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केलेली खोली आतून लॉक होती का? या महत्वाच्या प्रश्नांना पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. आम्ही योग्य दिशेने तपास करतोय असे साळवे म्हणाले.
विकास आणि भारती आमटे हे हेमलकसा येथून चंद्रपुरात न येता थेट आनंदवनकडे रवाना झाले आहे. शीतल आमटे यांच्यावर आनंदवन येथे आजचं अंत्यसंस्कार होणार आहे. बाबा आमटे यांच्या समाधी शेजारीच शीतल यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
संबंधित बातम्या :
Sheetal Amte | डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? सांगणाऱ्या शीतल आमटे; आत्महत्येनं महाराष्ट्रात खळबळ
डॉ. शीतल आमटेंची आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावरील पोस्ट, 'War and Peace'...
शीतल आमटे यांच्या आत्महत्येपूर्वी गेल्या काही महिन्यात काय-काय घडल?