Pradip Kurulkar : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर हे मुंबईतील DRDO च्या गेस्ट हाऊसमध्ये एकाहून अधिक महिलांना भेटल्याचं चौकशीत समोर आलं आहे. यातील एकही महिला DRDO च्या कार्यालयात काम करत नसल्याचंही तपासात पुढे आलं आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ही माहिती समोर आल्याने कुरुलकर रात्रीच्या वेळी गेस्ट हाऊसमध्ये कोणत्या महिलांना भेटत होते, याचा तपास एटीएस कडून केला जाणार आहे. त्याचबरोबर कुरुलकरांकडून तपासात आवश्यक ते सहकार्य न मिळाल्यास त्यांची पॉलीग्राफ चाचणी करावी लागेल, असं एटीएसने सांगितलं आहे. 


अनेक महिलांना भेटत होते कुरुलकर...


DRDO च्या मुंबईतील सांताक्रुझ भागातील गेस्ट हाऊसमध्ये प्रदीप कुरुलकर हे सातत्यानं महिलांना भेटत असल्याचं समोर आलं. यातील एकही महिला त्यांच्या नात्यातील किंवा DRDO मध्ये कर्मचारी नव्हत्या. ऑक्टोंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुरुलकर ज्यावेळी सांताक्रूझमधील गेस्ट हाऊसला राहिले त्यावेळचं सीसीटीव्ही तपासलं असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  कुरुलकर रात्रीच्यावेळी मुंबईच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटलेल्या महिलांची संख्या एक - दोन नाही तर त्याहून अधिक आहे. या महिला त्यांच्या परिचयाच्या आहेत. त्या नातेवाईक किंवा DRDO मध्ये काम करत नाहीत. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दास गुप्ता या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते त्याच कालावधीत झालेल्या या गेस्ट हाऊसमधील भेटी आहेत. त्यामुळं त्यांचा काही परस्पर संबंध आहे का? याचा एटीएस तपास करत आहेत. 


एटीएसने कुरुलकरांकडून काय जप्त केलं?



  • अॅपल कंपनीचा लॅपटॉप आणि चार्जर 

  • वन प्लस कंपनीचा काळ्या रंगाचा  6 T मॉडेलचा मोबाईल आणि त्याचा चार्जर 

  • वन प्लस कंपनीचा आकाशी रंगाचा 10 T मॉडेलचा मोबाईल 

  •  HP कंपनीची हार्ड डिस्क 

  • लाल रंगाचा आयफोन 11 

  • वन प्लस कंपनीचा आणखी एक  6 T मॉडेलचा काळ्याच रंगाचा फोन जप्त केला आहे. 


 फोन बंद होता मात्र पॉलीग्राफ चाचणी ऐकताच...


कुरुलकरांकडून जप्त केलेल्या या डिव्हाइसेसमधील वन प्लस कंपनीचा 6T मॉडेलचा एक मोबाईल खराब अवस्थेत होता. हा मोबाईल पडल्याच्या  किंवा कशावर तरी आदळल्याच्या खुणा त्यावर होत्या. कुरुलकरांनी आपला हा मोबाईल खराब झाल्यानं बंद असल्याचं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. हा मोबाईल  फॉरेन्सिक लॅबला पाठवून तो सुरु करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र त्यात यश आलं नाही. मात्र एटीएसने पॉलीग्राफ चाचणीची गरज व्यक्त करताच कुरुलकरांनी स्वतः तो मोबाईल सुरु करून दिला आणि त्यामध्ये भारताच्या अनेक क्षेपणास्त्रांचे डिझाइन्स असल्याचं एटीएसला आढळून आलं. कुरुलकरांकडून अशाप्रकारे तपासात सहकार्य होत नसल्यानं गरज पडल्यास त्यांची पॉलीग्राफ चाचणी करावी लागेल, असं एटीएसने म्हटलंय. ही चाचणी करायची झाल्यास एकतर आरोपीची त्याला संमती असावी लागते आणि ती नसेल तर न्यायालयाने तसे आदेश द्यावे लागतात. 


कशी केली जाते पॉलीग्राफ टेस्ट?


पॉलीग्राफ चाचणीत ज्या व्यक्तीची चाचणी करायची आहे त्या व्यक्तीच्या हात आणि बोटांना, नाडी आणि रक्तदाब मोजणारी यंत्र जोडली जातात. या यंत्रांची दुसरी बाजू स्क्रीनला जोडली जाते आणि त्या व्यक्तीला प्रश्न विचारले जातात. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना तो व्यक्ती जर खोटं बोलला तर रक्तदाब किंवा नाडीचे ठोके किंवा हृदयाची गती वाढल्याचं स्क्रीनवर दिसतं आणि ती व्यक्ती खोटं बोलत असल्याचं सिद्ध होतं.यामुळं पॉलीग्राफ टेस्टला लाय डिटेक्टर टेस्ट देखील म्हणतात. 


कुरुलकरांवरुन राजकारण?


प्रदीप कुरुलकरांच्या या प्रकरणावरून आता राजकारणही सुरु झालं आहे . कुरुलकरांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांचा धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुरुलकर प्रकरणावरून लक्ष हटवण्याची राज्यात दंगली घडवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. प्रदीप कुरुलकरांच्या प्राथमिक तपासात सकृतदर्शनी त्यांनी गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचं DRDOने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे तर कुरुलकरांचं हे कृत्य देशविरोधी आणि आंतरराष्ट्रीय व्याप्ती असल्याचं एटीएसने न्यायालयात म्हटलं आहे . त्यामुळं एवढ्या गंभीर प्रकरणाची खोलात जाऊन तपास होण्याची गरज आहे.