नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या पत्रात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबाबत वापरलेली वाक्यरचना अत्यंत चुकीची असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मंत्रालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत खात्याच्या मुख्य सचिवांशी बोलणेही झाले आहे. महामानवांच्या यादीत अण्णाभाऊंचा समावेश करण्याचा निर्णय होणार असल्याचे आठवले म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी ही चुकीची वाक्यरचना लिहिली त्यांनी माफी मागितली पाहिजे असेही आठवले यावेळी म्हणाले.
नेमकं प्रकरण काय
केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या महामानवांच्या यादीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब भाजपच्या अनुसूचीत जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या लक्षात आली. याबाबत भालेराव यांनी फाऊंडेशनला पत्र पाठवून त्यात सुधारणा करण्याची विनंती केली होती. मात्र, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध नाहीत, त्यामुळे ते महामानव ठरत नाहीत असा उल्लेख असलेले पत्र फाऊंडेशनने सुधाकर भालेराव यांना पाठवले आहे. तसेच फाऊंडेशनच्या नियमाप्रमाणे राज्यातून अशा पद्धतीचा प्रस्ताव यावा लागतो. तो प्रस्ताव फाउंडेशनच्या बैठकीत ठेवून त्यावरती मान्यता घ्यावी लागते. मगच महामानवाच्या यादीमध्ये एखाद्या व्यक्तीचा समावेश होतो अशी फाऊंडेशनची प्रक्रिया आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या महामानवांच्या यादीत समावेश करण्याची प्रक्रिया जरी असली तरी फाऊंडेशनने पाठवेले पत्र संतापजनक आहे. कारण त्यांनी पत्रात उघडपणे अण्णाभाऊ साठेंची अवहेलना केल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध नाहीत, त्यामुळे ते महामानव ठरत नाहीत असा उल्लेख केलेले पत्र माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पाठवले आहे. त्यामुळे आता नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, फाऊंडेशनतर्फे अनुसूचित जातीसाठी कल्याणाच्या योजना राबवल्या जातात. तसेच समाजसुधारक, प्रबोधनकारांची जयंती साजरी करताना केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत केली जाते. या यादीमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत रविदास, संत कबीर या महापुरुषांसोबतच राज्यपातळीवरील छत्तीसगढचे संत व सतनामी समाजाचे गुरू बाबा घासीदास, केरळचे पुलियार समाजाचे गुरू संत अय्यंकली, तमिळनाडूचे गुरू नंदनार, महाराष्ट्रातील संत चोखामेळा, संत नामदेव यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन अंतर्गत देशभरातील महापुरुष, समाजसुधारक यांच्या विचारांचा प्रसार व प्रचाराचे काम होते. तसेच राष्ट्रीय आणि राज्यातील समाजसुधारक, प्रबोधनकारांचा फाऊंडेशनच्या यादीत समावेश आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय फाऊंडेशनच्या या उत्तरामुळे संताप व्यक्त होत आहे. या सगळ्या प्रकरणावर सुधाकर भालेराव यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मधल्या काळात भाजप आणि आधीच्या शासनाने अशा पद्धतीचा प्रस्ताव न दिल्यामुळे हा अनुचित प्रकार घडला आहे. ही चर्चा होत असताना पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा याबद्दलची चर्चा देखील सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: