कल्याण : कल्याणमध्ये आज आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद आंबदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले येथे आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वागत करताना दोघांनी एकमेकांचे नाव घेतले नाही. मात्र याबाबत रामदास आठवले यांनी चिमटा काढत राजकारणात कुणीही कुठंही येऊ शकतं, असं सूचक वक्तव्य केलं. या कार्यक्रमात पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, कल्पना सरोज आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
आता राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सत्ता असली तरी मागील 35 वर्ष शिवसेना भाजप युती होती, अजूनही वेळ गेली नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या भल्याचा विचार केल्यास पुन्हा शिवसेना, भाजप, आयपीआय महायुतीची सत्ता येऊ शकते. राणे आणि शिवसेना वादाबाबत बोलताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, हा वाद मिटला पाहिजे असा सल्ला आठवले त्यांनी दिला. तसेच राणे यांच्यावर जी अटकेची कारवाई झाली ती चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनसे-भाजप युती झाल्यास भाजपाला मोठे नुकसान होण्याची शक्यता
मनसे-भाजप युतीबाबत बोलताना, मनसे आणि भाजपची भूमिका वेगळी आहे. मी भाजपला सांगणार आहे की मनसेसोबत युती करू नका. मनसे सोबत गेल्यास भाजपचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे मनसे भाजप युती होणं अशक्य आहे ,आरपीआय भाजप सोबत असताना मनसेची गरज नाही, असं स्पष्ट केलं.
पुणे आणि आसपासच्या भागात राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत जास्त आहेत. स्थानिक पातळीवर अत्याचार होतात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या सांगण्यावर हे अत्याचार होत नाहीत. मात्र स्थानिक पातळीवर अत्याचार होत असल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली असावी म्हणून त्यांनी तसे विधान केले असावे, असं रामदास आठवले यांनी म्हटल. तसेच आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक आरपीआय भाजप सोबत लढणार असल्याचं आठवले यांनी सांगीतले.