Cyber Crime News : महाराष्ट्रात ऑनलाईन फसवणूकीचे रोज अनेक प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हे रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असतानाच नाशिकमध्ये समोर आलेल्या एका घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत. कुठलाही ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर केलेली नसतानाही एका ६१ वर्षीय वृद्धाच्या बँक अकाउंटवर हॅकर्सने दरोडा टाकला. या वृद्धाच्या खात्यातून सात लाख 28 हजार रुपये हॅकर्सने चोरले असल्याचे समोर आले आहे. 


इलेक्ट्रिक मालाचे होलसेल विक्रेते विष्णू गुजराती यांचे बँक ऑफ बडोदामध्ये कॅश क्रेडीट खाते आहे. या खात्याचा वापर ते व्यवसायासाठी नेहमी करत असतात. नेटबँकिंग सेवेचाही ते लाभ घेतात. तसेच नेटबँकिंग करताना योग्य ती खबरदारीही घेतात. मात्र २७ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी नेटबँकिंगसाठी त्यांनी लॉग इन करताच त्यांना धक्काच बसला. त्यांच्या बँक अकाउंटवरून आयएमपीएस आणि एनईएफटी द्वारे तीन वेळा व्यवहार करत ७ लाख २८ हजार रुपये हे काढून घेण्यात आले. ही सगळी रक्कम एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. 


विशेष म्हणजे त्यांचा बँक खात्याशी लिंक करण्यात आलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मोबाईल सीमकार्डची सेवा २६ डिसेंबर पासून बंद पडली होती.  याबाबत गुजराती यांनी व्होडाफोन आयडियाच्या गॅलरीत जाऊन चौकशी केली असता कोणीतरी कस्टमर केअरला कॉल करून मोबाईल हरविला असल्याचे सांगितले. त्या कॉलवरून कंपनीने तुमच्या सीमकार्डची सेवा बंद केली असल्याचे त्यांना उत्तर देण्यात आले. त्याशिवाय त्यांचा Rediffmail चा मेल आयडी देखील बंद पडल्याचे समजताच विष्णू गुजराती यांनी 3 जानेवारी रोजी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ क आणि ड नुसार गुन्हा नोंद केला आहे. 


चोरांनी सीम स्वॅप किंवा मेल आयडी हॅक करत अशा प्रकारे पैसे काढले असावे असा संशय पोलिसांना आहे.  बँकेकडून किंवा संबंधित टेलिकॉम कंपनीकडून वृद्धाची वैयक्तिक माहिती दिली गेली का? या दिशेने देखील पोलीस तपास करत असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. नेटबॅंकींग करताना योग्य ती खबरदारी बाळगणे, पासवर्ड सतत बदलणे आणि त्यात विशेष अक्षर, अंकाचा समावेश करणे आदी पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी नागरिकांना केले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha