Dombivli Crime News : बँकेचं सर्व्हर हॅक करत तब्बल दीड कोटी रुपये लंपसा करण्यात आले आहेत. डोंबिवली नागरी सहकारी बँकेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा तपासासाठी ठाणे नौपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर हॅकर्सच्या रडारवर आता बँका असल्याचे समोर आलं आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एका अज्ञात हॅकरने बँकेला दीड कोटी रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी बँक प्रशासनाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले
डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर कोणीतरी अज्ञात इसमाने हॅक करत सर्व्हरमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर बँकेच्या डाटामध्ये फेरफार केला व बँकेची एक कोटी 51 लाख 96 हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ठाणे नौपाडा येथे शाखेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात अचानक जास्त पैसे आल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत त्याने नौपाडा शाखेत तक्रार दिली.
डोंबिवली सोनारपाडा येथील मुख्य शाखेत बँक प्रशासनाने याचा तपास केला. तपासाअंती या बँकेचे डेटा सेंटर नवी मुंबई महापे येथे असून महापे येथून बँकेचा सर्व्हर हॅक करून एका अज्ञात हॅकरने बँकेची दीड कोटीची फसवणूक केल्याचे उघड झाले. अज्ञात हॅकर बँकेची रक्कम कमी बॅलन्स असलेल्या खात्यात वळती करत त्या खात्यातून अज्ञात खात्यात वळती केली होती. सदर बाब उघड होताच या प्रकरणी बँक प्रशासनाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मानपाडा पोलिसांनी या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत हा गुन्हा ठाणे नौपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.