Dombivli Water Supply News: डोंबिवली शहराजवळ असलेल्या ग्रामीण भागात पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकाची वणवण सुरू आहे. धरणात पुरेसे पाणी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असताना आपल्याला पिण्यासाठी देखील पाणी का नाही? हा नागरिकाचा सवाल आहे. मोर्चा, आंदोलने, निवेदने दिल्यानंतरही पाणी प्रश्न सुटत नसल्याने नागरिकाचा संयम सुटू लागला आहे. त्यातच शनिवारी पाण्यामुळे संदप देसलेपाडा परिसरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा बळी गेल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे. आज देसलेपाडा परिसरातील काही सोसायट्या मधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला त्रागा व्यक्त करत पाणी प्रश्न न सुटल्यास आयुक्त दालनावर धडक देण्याचा इशारा दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली शहरालगत असलेल्या सागर्ली, नांदिवली, भोपर, संदप, उसरघर या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी घोटभर देखील पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. पिण्यासाठी विकतचे पाणी आणताना आधीच हातावर पोट असलेल्या नागरिकाचे हाल होत असून कामावरून येताना बाटल्या भरून किंवा नातेवाईकाकडून बाटल्या मधून पाणी भरून आणत नागरिक पिण्याच्या पाण्याची गरज कशीबशी भागवत आहेत.  तर इतर वापरासाठी पाणी आणायचे कुठून या प्रश्नाला नागरिकांना कोणीही उत्तर देत नाही. 


परिसराच्या शेजारी असलेल्या खदानीतील पाण्यावर आपल्या दैनदिन गरजा भागविणाऱ्या नागरिकाचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. त्यातच शनिवारी खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आज देसलेपाडा नवनीत नगर  परिसरातील काही सोसायट्यामधील शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. विकासकाने घरे घेताना मुबलक पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता घोटभर देखील पाणी नसताना नागरिकांनी जगायचे कसे? असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dombivli : पाणी टंचाईने घेतला जीव! डोंबिवलीत खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू 


Weather News : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज