Palghar News : बोईसरमधील सर्वात मोठ्या असलेल्या विराज प्रोफाइल या कंपनीत काल लेबर युनियनच्या स्थापनेवरून भीषण असा राडा झाला. मुंबई लेबर युनियनच्या कर्मचाऱ्यांनी थेट कंपनीत शिरकाव करत कंपनीत तोडफोड सुरू केली. त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. या मारहाणीत 17 पोलिस कर्मचारी आणि दोन पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसर येथील तुंगा आणि टिमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कंपनीच्या परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे .
बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतील विराज प्रोफाइल या कंपनीतील युनियन स्थापनेचा वाद थेट हाणामारी, दगडफेक आणि लाठीचार्ज या वर जाऊन पोहोचला आहे. मागील दोन महिन्यांपासून मुंबई लेबर युनियन आणि स्थानिक विराज कंपनीतील युनियन यांच्या आस्थापनेवरून कंपनीत कामगारांचा वाद सुरू होता. हा वाद थेट न्यायालया पर्यंत पोहचला असून न्यायालयाकडून या प्रकरणात पुढील काही दिवस मुंबई लेबर युनियनच्या कामगारांना विराज कंपनी च्या आवारात जाण्यास बंदी घालण्यात आली होती.
मात्र कंपनी काही कंत्राटी कामगारांना आतमध्ये घेऊन काम सुरू ठेवत असल्याची चाहूल कर्मचाऱ्यांना लागताच जवळपास तीनशे ते चारशे मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी थेट कंपनीच्या आत मध्ये शिरून राडा सुरू केला. या राड्यानंतर मदतीसाठी आलेल्या पोलिसांनाही मुंबई लेबर युनियनच्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाण आणि दगडफेकीत तब्बल 17 पोलीस कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर बोईसरमधील टिमा आणि तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जवळपास 27 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
दगडफेक सुरू केल्यावर पोलिसांनी ही दुसऱ्या बाजूने लाठीचार्ज सुरू केला या लाठीचार्जमध्ये अनेक कामगारही जखमी झाले आहेत. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत विराज प्रोफाइल ही सर्वात मोठी कंपनी असून या कंपनीत जवळपास आठ ते दहा हजार कामगार काम करतात. येथील कामगारांनी मुंबई लेबर युनियन स्थापनेसाठी मागील दोन महिन्यांपासून काम बंद आंदोलन केलं होतं. मात्र या युनियनला कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक लेबर युनियनच्या कामगारांचा विरोध होता त्याच वादातून हा राडा झाल्याच आता उघड झालंय. या वादात कंपनी आणि परिसरात असलेल्या वाहनांचीही कामगारांकडून तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आजही या कंपनी बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून कंपनी आणि परिसराला पोलिस छावणीचं स्वरूप आले आहे.