Weather News : सध्या देशात उष्णतेची लाट आली आहे. नागरिकांना वाढत्या तापमानाचा मोठा त्रास होत आहे. अशातच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप याचा काही परिणाम झाला नसून, राज्यात उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्याला अद्याप उकाड्यापासून दिलासा मिळाला नाही. अशातच आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


आज धुळे, जळगाव आणि अहमदनगरमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमाल तापमानात वाढ होणार आहे. तर उद्या (10 एप्रिल) धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नाशिकात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर विदर्भात उद्यापासून १२ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान अधिक असणार आहे. तिथे उष्णतेच्या लाटेचा अंदाज असणार आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नागपुरात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेमुळे तापमान 45 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 11 आणि 12 मे रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाने सांगितली आहे.


बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. आज उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरातील प्रणालीची तीव्रता वाढल्याने शनिवारी अंदमान बेटांजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार झाले होत. ही प्रणाली पोर्टब्लेअरपासून 300 किलोमीटर नैर्ऋत्येकडे, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) पासून 1270 किलोमीटर, तर पुरी (ओडिशा)पासून 1300 किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात होती. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे आज चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. मंगळवारपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्याकडे येणार असून, त्यानंतर ही प्रणाली पश्‍चिम बंगालकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: