बारामती : बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून बनवलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच या औषधातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतो. सोबतच कोरोनामुळं शरीरावर होणारे दूरगामी परिणाम टाळता येऊ शकतात असा दावा बारामतीतील डॉक्टरांनी केला आहे.  हळदीमध्ये आढळणारा करक्युमीन हा पोषक घटक व काळी मिरी यांचे मिश्रणातून हे औषध बनवण्यात आले आहे.बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी (Frontiers in Pharmacology)  यामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले. बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (ICMR) यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची क्लिनीकल ट्रायल 140 रुग्णांवर  घेण्यात आली. यात सौम्य लक्षणे , मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे  असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता. 


करक्युमीन औषधाच्या वापरातून हे निष्कर्ष काढले


- करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रणयुक्त गोळ्या  दिलेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले.
- हे औषध घेणाऱ्या रुग्णांमधील गंभीरतेचे प्रमाण खूप कमी झाले
- हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी 7 ते 27 दिवस होता तर करक्युमीन  घेतलेल्या रुग्णांचा 5 ते  10 दिवस होता.
- करक्युमीन  घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली.
- मध्यम  व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला.
- रक्त पातळ करणाऱ्या हेपॅरिन या इंजेक्शन बरोबर करक्युमीन दिल्यास फायदा होतो व कोणतेही दुष्परिणाम  होत नाही हे सिध्द झाले.
- या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता  प्रवाही राहण्यास मदत झाल्यामुळे कोविडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम,  ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या व शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.
- कोविड होऊन गेल्यावरही पुढील 3 महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून  कोविडमुळे होणारे दुरगामी परिणाम (Thrombo - embolic complications) टाळण्यासाठी मदत होऊ शकते याचा शास्त्रीय पुरावा या संशोधनाद्वारे मांडण्यात आला.