जळगाव : चारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टर पतीने वकील पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पत्नीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा बनाव आरोपीने रचला. अंत्यसंस्काराच्या तयारीत असलेल्या डॉक्टर पतीला पोलिसांनी अटक केली. पतीविरोधात जळगावातील जामनेर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या राजपूत उर्फ राखी पाटील जळगाव न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. 15 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह जामनेरमध्ये निसर्गोपचार करणारा डॉ. भरत पाटील यांच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. मात्र काही वर्षांतच पती-पत्नीमध्ये सारखे खटके उडू लागले.
वकिलीच्या पेशामुळे विद्या कायमच अनेकांशी फोनवर बोलत असत, मात्र यावरुन पती कायम त्यांना टोकून बोलत असे. दोघांमध्ये वाद वाढू लागले आणि डॉ. भरत पाटीलने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली.
13 जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास राहत्या घरातच पती-पत्नीत मोठा वाद निर्माण झाला. यावेळी डॉ. भरत पाटीलने पत्नी विद्या यांना बेदम मारहाण करुन त्यांचा गळा आवळला.
विद्या यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा बनाव आरोपीने रचला. इतकंच नाही, तर त्याने अंत्यसंस्काराची तयारीही सुरु केली. मात्र माहेरच्या मंडळींना विद्या यांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी पोस्टमार्टम करण्याची मागणी केली. डॉ. भरतने त्याला विरोध करताच त्यांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी पतीविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली.
पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भरतने आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. अखेर काल रात्रीच्या सुमारास डॉ भरत पाटील विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
डॉक्टर पतीकडून वकील पत्नीची हत्या, हार्ट अटॅकचा बनाव
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
15 Jan 2019 12:34 PM (IST)
पत्नीवरील संशयातून डॉक्टर पतीने सरकारी वकील असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. हा प्रकार दडपण्यासाठी त्याने पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. जळगावात ही घटना घडली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -