घडले तसे लिहिणे म्हणजे ‘सत्य’ हीच इतिहासाची प्राथमिकता असली तरी या मर्यादेतच इतिहासाची व्याख्या असेल तर आजच्या आधुनिक काळांत ती सर्वांना सवार्थाने मान्य होईलच असे नाही. घटनांच्या मागे राजकीय, आर्थिक, सामाजिक व धार्मिक अशा विधि शक्ती असतात. त्या शक्तींच्या वाहक व्यक्ती असतात आणि व्यक्तींचा समूह म्हणजे समाज असतो. या समाज शक्तीच्या संदर्भात विचार केला तर घटना केवळ घटीतात मोडतात. त्यांना स्वतःचे असे काही कर्तृत्व नसते. कुठल्यातरी कारणाने त्या कार्यरुपाने अस्तित्वात आलेल्या असतात. महत्त्व असते त्याच्या परिणामाच्या विश्लेषणाला.


हैदराबाद संस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी अथवा प्रमुख कार्यकर्त्यानी लढ्यातील प्रमुख घटना, व्यक्ती व प्रसंगाच्या आठवणी लेखी स्वरुपांत ठेवण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे या गौरवशाली लढ्याचा इतिहासच आता इतिहासजमा होतो की काय? अशी साधार भीती मनामध्ये निर्माण होत आहे. या नेत्यांच्या लढ्याबद्दल न लिहिण्याचा विचार करतां असे वाटते की, विकार व अहंकार लोप पावून समष्टीच्या संदर्भात व्यक्तीचे शून्यवत अनासक्त होणे या आध्यात्माचा तत्कालीन नेत्यावर प्रभाव होता की, त्यांना आपल्या श्रेष्ठतम कार्याचे महत्त्वच मंजूर नव्हते की काय? 


हैदराबाद संस्थान कसे स्थापन झाले?


हैदराबाद संस्थानच्या स्थापनेचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. दिल्लीस्थित मोगलांचा बादशहा शहाजहान सत्तेवर असतांना समरकंद - बुखाऱ्याहून खाजा अबिदअली नांवाचा एक इसम दिल्लीत आला. बऱ्याच दिवसांनी बऱ्याच प्रयत्नांनी त्याची बादशहा शहाजहानची भेट झाली. बादशहाने त्याची चौकशी केली असतां हा इसम मोगलांच्या मूळ भागांतील असल्याचे त्याला समजले. तो इतक्या दूर आपणांस भेटावयास आल्यामुळे त्याला मनःस्वी आनंद झाला. त्याच्या कामाबाबत चौकशी केली असता खाजा अबिदअलीने मक्केची यात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली व बादशहाकडून त्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. बादशहाने त्याच्या मक्केच्या यात्रेसाठी उंट, द्रव्य, अन्नधान्य व काही नोकरचाकरांची व्यवस्था केली. मक्केची यात्रा पूर्ण करून काही महिन्यांनी तो पुन्हा बादशहाच्या भेटीला व आभार व्यक्त करण्यासाठी दिल्लीला आला. त्याने बादशहाची भेट घेऊन आभार व्यक्त केले. बादशहाने त्यास आपल्याच दरबारांत चांगल्या हुद्यावर नोकरीस ठेवले. त्याने पण मेहनत व प्रामाणिक गुणांवर बादशहाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपला मुलगा शहाबुद्दीन यास समरकंद - बुखारावरुन दिल्लीस बोलावून घेतले. बादशहाने मोगल सल्तनतचा वजीर सादुल्लाखान याच्या मुलीबरोबर शहाबुद्दीनचा विवाह करुन दिला. त्यामुळे अबिदअली व त्याचा मुलगा शहाबुद्दीन याचे बादशहाच्या दरबारांत खूपच वजन वाढले. 


पुढे बादशहा शहाजहानचा पुत्र औरंगजेब व बादशहाचे इतर पुत्र यांनी बादशहा शहाजहानच्या विरोधात बंड पुकारले. खाजा अबिदअलीने आपल्याला मक्केच्या यात्रेसाठी मदत करणाऱ्या एवढेच नव्हे तर आपल्याला नोकरी देऊन आपले भले करणाऱ्या बादशहा शहाजहानची बाजू न घेतां बादशहाच्या जीवावर उठलेल्या बादशहाच्या इतर मुलांपेक्षा बलवान असलेल्या औरंगजेबास सक्रिय पाठिंबा दिला. औरंगजेब वेगाने हालचाली करून दिल्लीस पोहचला. आपल्या वडिलांस म्हणजे शहाजहानास कैदेत टाकले व इतर भावांचा पराभव करुन कोणास कैदेत टाकले तर कोणाचा शिरच्छेद करुन तो निर्वेधपणे दिल्लीच्या गादीवर विराजमान झाला. 


पुढे औरंगजेबाच्या दक्षिणेकडील स्वारीत कुतुबशाहीच्या गोवळकोंड्याच्या किल्ल्यास वेढा दिला असतां खाजा अबिदअली मारला गेला. औरंगजेबाने अबिदअलीच्या कुर्बानीची कदर करीत त्याचा मुलगा शहाबुद्दीन याला गुजरातची सुभेदारी बहाल केली. या शहाबुद्दीनचाच मुलगा मीर कमरुद्दीन हा दिल्लीच्या मोगल दरबारांत सरदार या नात्याने बादशहाची सेवा करीत होता. हा मीर कमरुद्दीन अतिशय शूर-वीर, धूर्त, धोरणी आणि जबर महत्त्वाकांक्षी होता. बादशहाच्या दरबारी असणाऱ्या अनेक सरदारांपैकी मोजक्याच सरदारांकडे स्वतःचे खडे सैन्य होते. त्यापैकी मीर कमरुद्दीन याच्याकडे इतर सरदारांपेक्षा कितीतरी जास्त खडे सैन्य होते. त्यामुळे बादशहाकडे व त्याच्या इतर सरदारांमध्ये वजन तर होतेच, पण त्याचा जबरदस्त वचक देखील होता. म्हणून बादशहाच्या दरबारांतील इतर सरदार त्याचा द्वेष व मत्सर करीत असत. 


मुघलांना शह, हैदराबाद संस्थानाची निर्मिती


औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या काळांत कोणताही बादशहा कर्तबगार न झाल्यामुळे मोगलांची बादशाही खिळखिळी होत चालली. त्या काळांत हसन आणि हुसेन या सय्यद बंधुचे प्रस्थ दरबारांत वाढलेले होते. या दोन्हीही बंधुंना मीर कमरुद्दीन ही बादशाहीच आपल्या ताब्यात घेईल अशी भीती वाटत होती. आणि मग आपलं काय होणार? याची काळजी वाटत होती. मीर कमरुद्दीन हा शक्तीशाली सरदार असल्यामुळे दूरच्या दक्षिणेकडील प्रदेशात त्याची बदली करावी असे बादशहास सुचविले. बादशहास देखील मनांतून त्याची धास्तीच वाटत असल्याने दूरच्या माळवा प्रांताचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नेमणूक केली. मीर कमरुद्दीनला हे सर्व कारस्थान कोणी व कां केले हे सर्व माहित होते, परंतु धूर्तपणे अतिशय संयम राखून तो शांत डोक्याने विचार करत होता. मीर कमरुद्दीन बादशहाच्या आदेशासंदर्भात काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने प्रत्यक्ष बादशहा, त्याचे दरबारांतील सर्व साथीदार आणि सय्यद बंधू आता काय होणार? या विचारात पडले असतानाच मीर कमरुद्दीन याने बादशहाच्या भेटीची परवानगी मागितली. त्यांस भेटीची परवानगी द्यावी की नाही? याबाबत बादशहाने वजीरासह काही प्रमुख सरदार व सय्यद बंधूंशी गुप्तपणे चर्चा केली. मीर कमरुद्दीन यांस भेटीची परवानगी देण्यापेक्षा परवानगी न देणे जास्त धोकादायक असल्याने त्यास परवानगी देण्याचा या सर्वांनी मिळून निर्णय घेऊन मीर कमरुद्दीनला तारीख व वेळ देऊन भेटीस बोलावले. मीर कमरुद्दीन दिलेल्या वेळेत दरबारांत पोहचला. दरबाराच्या मुख्य दरवाज्यात आल्याबरोबर त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला नंग्या तलवारी घेऊन धिप्पाड हबशी सैनिक त्याला दरबारांत घेऊन जाण्यासाठी आले. दरबाराच्या मध्यभागी त्या हबशी सैनिकांनी त्यास थांबविले. मीर कमरुद्दीनने प्रथम बादशहास तीनदा वाकून कुर्निसात केला आणि आपली कैफियत मांडताना त्याने प्रथम माळव्याची सुभेदारी दिल्याबद्दल बादशहाचे आभार मानले. व मला माझ्या कुटुंब कबिल्यासह माझ्या सर्व सैनिकांसह माळव्यास जाण्याची परवानगी. बादशहाने वजीराकडे व सय्यद बंधुंकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. वजीर व सय्यद बंधू बादशहाच्या कानाला लागले व म्हणाले, तो सैन्यासह जात असेल तर बरेच झाले आपली पीडा टळली. त्याला सैन्यासह जाण्याची परवानगी द्यावी. बादशहाने हसून मान हलविली आणि वजीराने मीर कमरुद्दीनला सैन्यासह माळव्यास जाण्याची परवानगी देण्यात येत आहे असे दरबारांत जाहीर केले. दरबाराचे आजचे कामकाज संपल्याचे जाहीर केले. 


मीर कमरुद्दीनने बादशहाला पुन्हा तीनदा वाकून कुर्निसात केला आणि दरबाराच्या रिवाजाप्रमाणे बादशहास पाठ न दाखविता तो दरबाराच्या बाहेर पडला. त्याच्या डोक्यांत विचाराचे चक्र जेवढ्या वेगात फिरत होते तेवढ्याच वेगांत त्याच्या पुढील कामकाजाचे चक्र फिरत होते. त्याने आपल्या सैन्याला युद्धाच्या तयारीनेच कूच करण्याचे आदेश दिले. हत्ती, उंट, घोडे, पायदळ, तलवारी, भाले, बरची, तोफखाना त्याला लागणारा दारुगोळा, सैन्याच्या मुक्कामासाठी लागणारे तंबू व कुटुंब कबिल्यासाठी लागणारे भव्य शामियाने, मुबलक अन्नधान्य व युद्धासाठी लागणाऱ्या सर्व वस्तुंची जमवाजमव करून तो दिल्लीबाहेर पडला. ज्यावेळेस तो दिल्लीच्या बाहेर पडत होता, तेव्हां त्याचे सैन्यासह प्रस्थान दिल्लीकर डोळे भरुन पाहत होते. दिल्लीतून बाहेर पडताच त्याने वेगांत चालण्याचे सैन्याला आदेश दिले. तो घोड्यावरुन सैन्याच्या पुढे राहून सैन्याचे नेतृत्वही करत होता आणि सैन्याला मार्गदर्शन पण करत होता. अधूनमधून तो घोड्यावरुन मागे फिरून सैन्याची व कुटुंब कबिल्याची देखरेखही करत होता आणि वेगांत चालण्याचे आदेशही देत होता. मजल दरमजल करीत थोड्याच दिवसांत माळव्याला बगल देत तो सैन्यासह औरंगाबादच्या दिशेने निघाला. जसजसा तो औरंगाबादच्या जवळ जवळ येत होता, त्याचवेळी औरंगाबादचा सुभेदार मुबर्रेज खान त्याच्या गुप्तहेरांच्या माहितीवरुन सावध झाला. त्याने त्वरीत निर्णय घेऊन व वेगांत हालचाल करुन सैन्याची जमवाजमव सुरू केली. त्याला हे सर्व करण्यासाठी वेळ अगदीच कमी होता, परंतु त्या कमी वेळातही जेवढे शक्य होते तेवढे सैन्य घेऊन तो मीर कमरुद्दीनच्या दिशेने निघाला. दोन्ही सैन्याची 11 ऑक्टोंबर 1724 रोजी साखरखेडा जवळ तुंबळ लढाई झाली. या लढाईत मीर कमरुद्दीनच्या कवायती सैन्याने मुबर्रेज खानाच्या सैन्याचा दारुण पराभव केला. युद्धोत्तर परिस्थितीची देखभाल करण्याची सूचना त्याच्या सैन्याधिकार्याला देऊन तो सैन्यासह व कुटुंब कबिल्यासह वेगांत औरंगाबादकडे निघाला. औरंगाबादला पोहचताच त्याने सुभेदारीच्या तख्तावर (गादीवर) आपली तलवार ठेवली. त्या गादीला वाकून सलाम केला आणि लगेच त्याच तख्तावर बसून त्याने सैन्याधिकार्याला आपल्या सुभेदारीच्या अखत्यारीत असलेल्या बुऱ्हाणपूर, संपूर्ण वऱ्हाड, मराठी भाषिक मराठवाडा, तेलगू भाषिक संपूर्ण तेलंगणा, म्हैसूर राज्यातील कन्नड भाषिक तीन जिल्हे एवढ्या प्रचंड विस्तारीत भूभागावर मीर कमरुद्दीनची हुकुमत असल्याचा व फक्त आणि फक्त त्याचा हुकुम चालेल याचा दवंडी देऊन ढिंढोरा पिटला गेला. स्वतःच्याच बुद्धीचातुर्यावर त्याने एवढ्या मोठ्या भूभागावर स्वतःचे राज्य स्थापन केले.
 
मोगलांच्या गुप्तहेरांमार्फत ही बातमी दिल्लीच्या बादशहापर्यंत पोहचविण्यात आली. मोगलांच्या दिल्ली दरबारांत हलकल्लोळ माजला. मीर कमरुद्दीनने मोगल साम्राज्याच्या बाहेरचा प्रदेश जिंकून त्यावर राज्य केले असते तर मोगल बादशहाला काहीच आक्षेप नव्हता, परंतु मीर कमरुद्दीनने मोगलांच्याच प्रदेशाचा लचका तोडून त्यावरच आपले स्वतंत्र राज्य घोषीत केल्याचा मनातून खूप राग होता. बादशहाने वजीराशी व काही प्रमुख सरदारांशी गुप्त चर्चा केली व दुसऱ्या दिवशी सर्व सरदारांसह संपूर्ण दरबार भरविला. वजीराने मीर कमरुद्दीन याने दक्षिणेत जाऊन आपल्याच साम्राज्याच्या एका विशाल भूप्रदेशाचा तुकडा पाडून तेथे स्वतःचे राज्य स्थापन केले याची माहिती सर्व दरबारींना देऊन मीर कमरुद्दीनला त्याच्या गुन्ह्याबद्दल शासन देण्यासाठी कोण सरदार किंवा सुभेदार मीर कमरुद्दीनवर सैन्यासह चाल करुन जाण्यास तयार आहे त्याने उभे राहावे, असे आव्हान दिले. परंतु मोगल साम्राज्याच्या दुर्दैवाने आताच्या अफगाणिस्तानपासून आसामपर्यंत व काश्मीरपासून नर्मदेच्या तीरापर्यंत पसरलेल्या मोगलांच्या साम्राज्यांत एकही सरदार किंवा सुभेदार मीर कमरुद्दीनच्या विरूद्ध लढाईची हिंमत करू शकला नाही. एवढी मीर कमरुद्दीनच्या शौर्याची, सामर्थ्याची व बौद्धिक चतुराईची धास्ती या सर्वांनी घेतली होती. 


दिल्लीचा बादशहा मात्र विमनस्क अवस्थेत निराश होऊन हात चोळत बसला. एवढेच नव्हे तर बादशहानेच मीर कमरुद्दीन यास ‘निजाम - उल - मुल्क’ ही पदवी देऊन सन्मानित केले. हा केवढा दैवदुर्विलास! मीर कमरुद्दीन हा दूरदृष्टीचा चाणाक्ष व्यक्ती असल्याने त्यांने आपल्या राज्याची राजधानी औरंगाबाद ही उत्तरेकडील मोगल साम्राज्याच्या सरहद्दीवर येते म्हणून आपली राज्याची राजधानी मोगल साम्राज्याच्या सरहद्दीपासून दूर असली तर आपल्या राज्याच्या व आपल्या वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने देखील सोयीची होईल म्हणून औरंगाबाद ऐवजी राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाग्यनगर (भागानगर) म्हणजेच आजचे हैदराबाद येथे राजधानी स्थापीत केली. पुढे काही कालावधीनंतर दिल्लीच्या बादशहाने याच मीर कमरुद्दीन यांस ‘आसफजाह’ हा किताब देऊन गौरवान्वीत केले. तेव्हांपासून मीर कमरुद्दीनच्या घराण्यास आसफजाही घराणे या नांवानेही संबोधीत करण्यात येऊ लागले. 


मीर कमरुद्दीनने 1724 पासून 1748 पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. त्याच्यानंतर त्याची चार मुले मीर सलाबत जंग, मीर नासिर जंग, मीर निजाम अली व मीर बसालत जंग यांची राज्याच्या गादीसाठी म्हणजे सत्तेसाठी आपसांत भांडणे झाली व राज्यांत बंडाळी माजली. मीर कमरुद्दीन जिवंत असतानाच मीर नासिर जंग याने फ्रेंचांच्या मदतीने बापाविरुद्ध बंड करुन 1748 ते 1750 पर्यंत गादी बळकावली. 1750 मध्ये त्याचा खून झाला. नंतर फ्रेंचांनी मीर कमरुद्दीनच्या मुलीचा मुलगा मुजफ्फर जंग यांस गादीवर बसविले. परंतु तो पाँडेचरीहून परत येत असतानाच मारला गेला. नंतर फ्रेंच सेनापती मेजर बुसी यांने सल्लामसलत करुन मोठा मुलगा सलाबत जंग यास निजामाच्या गादीवर बसवले. त्यावेळी तिसरा मुलगा निजाम अली हा वर्हाड प्रांताचा सुभेदार म्हणून कामकाज पाहत होता. सलाबत जंगाचा दिवाण शहानवाज खान हा फ्रेंचांच्या विरोधात होता. त्याला निजामाच्या राज्यांतला फ्रेंचांचा सततचा हस्तक्षेप मान्य नव्हता. पेशव्यांच्या मदतीने फ्रेंचांचा पराभव करावा ही त्याची इच्छा होती.


नेमक्या त्याच काळात सैन्याच्या पगार थकल्यामुळे सैन्याने बंड पुकारले. ते बंडखोर सैनिक दिवाण शहानवाज खानाच्या महालावर चालून गेले. दिवाण शहानवाज खान आपला जीव वाचविण्यासाठी तिथून पळून गेला. विश्वासराव पेशव्यांनी त्याचवेळी औरंगाबादवर हल्ला चढविला. निजामाने इंग्रजांच्या सहाय्याने त्यांच्याशी तह करुन अतिशय चतुराईने आपल्या राज्यावरील संकट टाळले. निजाम बनलेल्या सलाबत जंगने आपला भाऊ बसालत जंग याची आपल्या राज्याचा दिवाण म्हणून नेमणूक केली. बसालत जंग याने आपला भाऊ निजाम अली यास आपल्या मदतीसाठी हैदराबाद येथे बोलावले. निजाम अली याच संधीची वाट पाहत होता. तो लगेचच हैदराबाद येथे आला. थोड्याच दिवसांत त्याने सलाबत जंगकडून राजमुद्रा हस्तगत केली व स्वतःच निजाम पदावर बसल्याची घोषणा केली. फ्रेंचांना त्याचे हे कृत्य आवडले नाही. कारण निजाम अली फ्रेंचच काय पण इतर कोणाच्याही ऐकण्यात नव्हता. तो स्वतंत्र राज्य कारभार करू इच्छित होता. फ्रेंचांनी त्याला पुन्हा वऱ्हाडची सुभेदारी स्वीकारण्याबद्दल आणि त्याची राज्याच्या सुरक्षेची हमी घेतली. परंतु त्याने ती तडजोड अमान्य केली. त्याने 6 जुलै 1762 ला सलाबत जंग याला अटक करुन बिदरच्या किल्ल्यात ठेवले व पुढे त्याचा खून करविला. निजाम अलीने 1762 ते 1803 पर्यंत राज्य केले. त्यानंतर सिकंदरजाह 1803 ते 1829, नासिरुद्दौला 1829 ते 1857, अफजलुद्दौला 1857 ते 1869, मीर महेबूबअली याने 1869 ते 1911 पर्यंत राज्यपद सांभाळले. मीर उस्मान अली हा सातवा आणि शेवटचा निजाम. याने 1911 ते 1947 पर्यंत राज्याचा प्रमुख म्हणून हैदराबाद संस्थानचा कारभार सांभाळला. मीर उस्मान अलीचा जन्म 6 एप्रिल 1886 रोजी झाला. महेबूब अलीची अनधिकृत पत्नी अमतुज जेहरा बेगम हिच्यापासून झालेला हा मुलगा. अमतुज जेहरा ही जितकी सुंदर होती तितकीच पाताळयंत्री व महत्त्वाकांक्षी होती. तिने सहावा निजाम महेबूब अलीस त्याच्या अधिकृत पत्नीस जरी पुढे मुलगा झाला तरी माझ्याच मुलास राज्याच्या गादीवर बसविले जाईल बसे महेबूब अलीकडून अभिवचन घेतले. 


पुढे 1898 साली त्याला औरस पुत्र झाला. सलाबतजाह त्याचे नाव. परंतु महेबूब अलीने अमतुज जेहरा बेगमला वचन दिल्याप्रमाणे त्याने उस्मान अलीस गादीचा वारस म्हणून मान्यता दिली. एवढेच नव्हे तर राज्यातल्या कारभारी मंडळासमोर महेबूब अलीकडून वचन घेतले, त्या कारभारी मंडळाकडून 1889 सालीच राज्याचा वारस म्हणून उस्मान अलीच्या नावावर शिक्कामोर्तब करुन घेतले होते. 29 ऑगस्ट 1911 रोजी मीर महेबूूब अलीचा मृत्यू झाला. 2 सप्टेंबर 1911 रोजी इंग्रज रेसिडेंट अॅलेक्झांडर पिन्हे याने उस्मान अलीस गादीवर बसण्याची मान्यता दिली. 8 सप्टेंबर 1911 रोजी खिलमत महाल (हैदराबाद) मध्ये उस्मान अलीस गादीवर बसवण्याचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. उस्मान अलीस गादीवर बसण्यास ज्यांनी मदत केली त्यापैकी एक शहर कोतवाल सुलतान यावर जंग हा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबाद शहराचा तो पोलीस प्रमुख होता. त्याची दहशत, दरारा फार मोठा होता. उस्मान अलीची आई अमतुज जेहरा बेगमने आपल्या मुलाला गादीवर बसवतांना अतिशय धूर्त व धोरणीपणाने शहर कोतवालची मदत घेतली होती आणि उस्मान अलीचा राज्यारोहण समारंभ पार पडताच थोड्याच दिवसांत सुलतान यावर जंग याची शहर कोतवाल पदावरुन उचलबांगडी करून तेथे लालखान याची नेमणूक केली. त्याचप्रमाणे वारसा निश्चितीमध्ये निजाम मीर महेबूब अलीच्या इच्छेनुसार त्यांचे प्रधान महाराजा किशनप्रसाद यांनी देखील मीर उस्मान अलीस गादीवर बसविण्यासाठी मोलाचे योगदान दिले, परंतु त्यांना देखील थोड्याच वर्षात पंतप्रधान पदावरून हटवले, परंतु त्यांची आवश्यकता वाटल्यानंतर महाराजा किशनप्रसाद यांची पुन्हा 1928 साली पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. अशा प्रकारे निजाम राज्याच्या सत्तेवर केवळ आणि केवळ मीर उस्मान अलीचा निरंकुश व निर्वेध एकहाती कारभार होता.


हैदराबाद संस्थानातील परिस्थिती


हैदराबाद संस्थानातील सामाजिक, राजकीय, धार्मिक व आर्थिक स्थिती फारच भयावह आणि विदारक होती. सामाजिक परिस्थितीचा विचार करता मुस्लिमेत्तर इतर धार्मिक जनतेवरील अन्यायाची परिसीमा गाठली होती. 1941 च्या जनगणनेनुसार हैदराबाद संस्थानची लोकसंख्या 1 कोटी 63 लाख 38 हजार 534 होती. त्यापैकी मुस्लिम लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 12 टक्के होती. परंतु संस्थानातील नोकर्यांचे प्रमाण पाहता ओहदे कुलिया म्हणजे मुख्य व महत्त्वाच्या पदांवर 95 टक्के मुस्लिम व 5 टक्के मुस्लिमेत्तर होते. ओहदे गैरकुलीया म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील पदांवर 81 टक्के मुस्लिम होते. शैक्षणिक परिस्थितीचा विचार केला तर संस्थानातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त 4 टक्के विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. जसजसे वरच्या वर्गात जाईल तसतसेच गळतीचे प्रमाण खूपच मोठे होत असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी एकूण लोकसंख्येपैकी फक्त 7615 एवढेच होते. यावरुन शैक्षणिक दुरावस्थेची कल्पना येऊ शकते. राजकीय परिस्थितीचा विचार करतां राज्यांतील जनतेने संस्थानच्या राज्यकारभारात जनतेचा सहभाग असावा अशा प्रकारची मागणी लावून धरली तेव्हा निजामाने नाईलाजाने निवृत्त न्यायमूर्ती राय बालमुकुंद यांची एकसदस्यीय समिती स्थापन केली. निजाम आपल्या संस्थानात राजकीय प्रतिनिधी देण्याची प्रक्रिया अतिशय सावधपणे व तितक्याच संथगतीने करत होता. त्यानंतर त्याने 22 सप्टेंबर 1937 साली राजकीय सुधारणा सुचविण्यासाठी दिवाणबहादूर आरमदू अय्यंगार यांच्या अध्यक्षतेखाली काशीनाथराव वैद्य, बॅ. अकबर अलीखाँ, जी.एन. कुरेशी आणि कादिर हुसेन अशा पाचजणांची समिती नेमली. या समितीने 31 ऑगस्ट 1938 साली आपला अहवाल सादर केला. निजामाने 19 जुलै 1939 साली या राजकीय सुधारणांना मान्यता दिली. त्यानुसार कायदेमंडळात 85 सभासद असतील. त्यापैकी 42 लोकनियुक्त प्रतिनिधी असतील तर 43 सरकार नियुक्त असतील. त्या मध्ये 5 अस्पृश्य व बाकीचे सर्व मुसलमान असतील. मंत्रीमंडळ 10 लोकांचे असेल, त्यात 8 मुस्लिम, 1 हिंदू आणि 1 इतर असे प्रमाण ठरविले होते. म्हणजे सरासरी 80 टक्के हिंदुंना 10 टक्के आणि 10 टक्के मुस्लिमांना 80 टक्के प्रतिनिधीत्वाची तरतूद होती. निजामाची केवढी समानता व उदारता होतीं! एवढेच नव्हे तर मतदानाचा अधिकार संस्थानातील लोकसंख्येच्या दीड टक्के लोकांनाच होता. बहुसंख्यांक हिंदुंना अतिशय अत्यल्प दिलेल्या राजकीय अधिकारास सुद्धा इत्तेहादूल या संघटनेने विरोध केला. निजामालाही हे अत्यल्प अधिकारही द्यायचेच नव्हते. दुसर्या महायुद्धाचे निमित्त साधून निजामाने 7 सप्टेंबर 1939 रोजी हे दिलेले अधिकार बेमुदत स्थगित केले.


जनतेचा असंतोष व आंदोलनाचा रेटा वाढतच चालल्याने निजाम सरकारने राजकीय सुधारणांचा नवीन प्रस्ताव मांडला. त्याप्रमाणे कायदेमंडळाच्या सदस्यांची संख्या 132 केली. त्यांत 76 निवडणुकीद्वारे व 56 नियुक्तीद्वारे. त्यातील 76 सदस्यांतही हिंदू मुस्लिमांचे प्रमाण 50-50 टक्के म्हणजे समान केले. तर राहिलेल्या 56 मध्ये सर्व मुसलमान. काही किरकोळ दुरूस्त्या सुचवून बी.एस. व्यंकटरावाच्या नेतृत्वाखालील अंजुमन ए पस्त अख्वामने या सुधारणांना मंजुरी दिली. परंतु महात्मा गांधी, पंडित नेहरु, अ.भा. काँग्रेस कार्यकारिणी, अ.भा. संस्थानी प्रजा परिषद, हैदराबाद स्टेट काँग्रेस, तीनही प्रांतिक परिषदा, डॉ.आंबेडकर प्रणित हैदराबाद स्टेट शेड्युल्ड कास्ट फेडरेशन इत्यादींनी या सुधारणांचा धिक्कार केला. एवढा विरोध असतानाही निजामाने 7 ऑक्टोंबर 1946 पासून या सुधारणा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे निवडणुकाही जाहीर केल्या. अंजुमन ए पस्त अख्वाम वगळता हैदराबाद स्टेट काँग्रेस व डॉ.आंबेडकर प्रणित हैदराबाद स्टेट शेड्युल्ड कास्ट फेडरेशन इत्यादींनी त्यावर बहिष्कार घातला. त्यामुळे या निवडणुका केवळ फार्स ठरल्या. 17 जानेवारी 1947 रोजी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांनी पस्त अख्वामच्या पालमपिल्ले डी. राजय्या, डी.धर्मापुरी, सोपानराव धन्वे व गणपतराव वाघमारे यांची दलित प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. नवीन विधानसभा 17 फेब्रुवारी 1947 रोजी सुरू झाली. ज्यांना या सुधारणा व निवडणुका मान्य नव्हत्या त्या सर्वांनी त्यादिवशी आपापल्या घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला. 


ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटिश संसदेमध्ये जून 1948 नंतर भारत स्वतंत्र होईल अशी घोषणा केली. त्यामुळे ब्रिटिश अमलाखाली असलेल्या भारतातील जनतेत व ब्रिटिशांचे मांडलिक असलेल्या संस्थानातील जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंतु देशातील 565 संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार दिल्यामुळे हैदराबाद संस्थानच्या जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. कारण हैदराबादच्या संस्थानिकाने फरमान-ए-मुबारक काढून दिनांक 11 जून 1947 रोजी संस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली संस्थानातील जनतेने स्वातंत्र्याचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.


हैदराबादचा निजामाचा कट, सरदार पटेलांचा शह 


ब्रिटिश भारतातील स्वातंत्र्यासाठीच्या अ.भा. काँग्रेसच्या जनआंदोलनाची प्रतिक्रिया संस्थानच्या जनतेवर प्रभावीपणे उमटत होती. त्यामुळे संस्थानमध्येही शांततामय व हिंसक अशा दोन्ही प्रकारच्या आंदोलनांमुळे संस्थानचे सरकार अस्वस्थ व असहाय्य झाले होते. त्यामुळे निजाम एका बाजुला आंदोलन चिरडून टाकण्याचा तर केंद्र सरकारशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करीत होता. भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन, भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू, भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याशी निजाम सरकारचा प्रतिनिधी वॉल्टर मॉक्टेन हा वाटाघाटी करीत होता. तो माऊंटबॅटनचा मित्र होता. माऊंटबॅटन व वॉल्टर मॉक्टेनला निजामाबद्दल सहानुभूती होती. निजाम संस्थानचे भारतामध्ये सामिलीकरण न करता त्याने भारताशी मैत्रीचा करार करावा व निजाम संस्थान कायमस्वरूपी स्वतंत्र ठेवावे अशी निजाम, माऊंटबॅटन व वॉल्टर मॉक्टेन यांची इच्छा होती. निजाम एकाचवेळी भारत सरकाशी वाटाघाटी करत असतानाच पाकिस्तानशीही संपर्क ठेवून होता. एवढेच नव्हे तर निजामाने भारताविरूद्ध संयुक्त राष्ट्रसंघाकडे (युनो) तक्रारही दाखल केली व संस्थानचा प्रश्न आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. तसेच पाकिस्तानला निजामाने 20 कोटी पौंडाची कर्जाची हुंडी देखील दिली होती. अशा प्रकारे एकाचवेळी भारताविरूद्ध संयुक्त राष्ट्रसंघात तक्रार करणे, भारताच्या शत्रुराष्ट्राला 20 कोटी पौंडाची आर्थिक मदत करणे अशी भारतविरोधी कृती करत असतानांच भारताशी मैत्रीच्या करारासाठी वाटाघाटी करणे अशी तारेवरची कसरत करीत होता. 


एवढेच नव्हे तर पोर्तुगाल व ब्रिटिश सरकारशीही वाटाघाटी करुन पोर्तुगालचे मडगांव बंदरातून शस्त्रास्त्रे आयात करण्याची व हवाईमार्गे शस्त्रे आयात करुन भारताविरूद्ध लढण्याची तयारी करत होता. निजाम संस्थान ते पोर्तुगालच्या गोव्यापर्यंत एक जोडणारा एक रस्ता (कॉरिडॉर) करण्याची परवानगी ब्रिटिश सरकार व पोर्तुगाल सरकार यांच्याकडे  मागितली होती. परंतु त्यात निजामाला यश आले नाही. तरीही निजाम शांत बसणारा नव्हता. त्याने पाकिस्तानच्या कराची विमानतळावरून निजाम संस्थानच्या बिदर व वरंगळ विमानतळावर शस्त्रे आयात केली. यासाठी ऑस्ट्रेलियन वैमानिक सिडनी कॉटन याने मदत केली. 


निजामाची ही दुहेरी चाल सरदार पटेल पूर्णपणे ओळखून होते. त्यामुळे निजाम, पंडित नेहरु, माऊंटबॅटन, मीर लायकअली व वॉल्टर मॉक्टेन यांनी सरदार पटेलांना हैदराबाद संस्थानचे अस्तित्व कायम ठेवून त्याचेशी मैत्रीचा करार करावा ही त्यांची सूचना सरदार पटेल यांनी स्पष्टपणे धुडकावली. एवढेच नाही तर निजाम संस्थान भारतामध्ये विलीन करणे एवढा एकच पर्याय निजामाकडे असल्याचेही त्यांनी सर्वांना अतिशय कठोर शब्दांत सुनावले. मार्च 1948 मध्ये सरदार पटेलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते डेहराडून येथे विश्रांतीसाठी गेले. जून 1948 अखेर माऊंटबॅटन इंग्लंडला कायमस्वरुपी परत जाणार होते. माऊंटबॅटन यांना निजाम संस्थानचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून त्याला भारतीय उपखंडातील राष्ट्रकुल परिषदेचा भारत, पाकिस्तान सारखा हैदराबाद हा देखील स्वतंत्र देश म्हणून राष्ट्रकुल परिषदेचा स्वतंत्र देश म्हणून सदस्य करण्याचे माऊंटबॅटन यांचे स्वप्न होते. जगाच्या पाठीवर हैदराबाद संस्थान स्वतंत्र देश म्हणून निर्माण करून त्यास ब्रिटिश साम्राज्याला आंदण देण्याचा माऊंटबॅटन व वॉल्टर मॉक्टेन यांचा विचार होता. परंतु सरदार पटेलांचा त्यांना कठोर विरोध होता. शेवटचा प्रयत्न म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन हे पंडित नेहरु, गोपालस्वामी अय्यंगार व संरक्षण मंत्री बलदेव सिंह यांना घेऊन सरदार पटेल यांना भेटण्यासाठी डेहराडून येथे गेले. माऊंटबॅटन यांनी पुन्हा सरदार पटेल यांच्याकडे ‘जैसे थे’चा प्रस्ताव ठेवला. सरदार पटेलांनी त्यास कडवटपणे विरोध केला. माऊंटबॅटन आता लवकरच भारतातून कायमचे निघून जाणार असल्याने सरदारांनी माऊंटबॅटन यांनी भारताला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले व अतिशय भावूक होऊन तुम्ही हवं ते मागा, तुमची इच्छा मी पूर्ण करतो असे आश्वासन दिले. या संधीचा फायदा घेऊन पुन्हा त्यांच्या हैदराबाद संस्थानशी मैत्री करण्याचा व ‘जैसे थे’ कराराच्या कागदावर सही करण्याचा आग्रह धरला. सरदार पटेलांनी अतिशय नाईलाजाने नुकत्याच दिलेल्या शब्दाची जाण ठेवून त्या करारावर निराश मनाने सही केली. सगळेजण दिल्लीला परत आले. वॉल्टर मॉक्टनला सरदार पटेल सही करतील असा विश्वास वाटत नव्हता. परंतु माऊंटबॅटनने सरदारजींच्या सहीचे ते कागदपत्र त्यांस दिल्यानंतर त्याला आनंदाचा व आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला कधी एकदा हैदराबादला जाऊन निमाजाची स्वाक्षरी घेतो असे झाले होते. तो तातडीने विमानाने हैदराबादेस गेला. निजाम व भारत सरकार यांच्यातील मैत्री कराराची कागदपत्रे विजयी मुद्रेने निजामास सादर केली. परंतु भारताचे सुदैव आणि संस्थानचे दुर्दैव असे की त्यावर चर्चेसाठी निजामाने बोलावलेल्या बैठकीत या मैत्री करारावर सही न करण्याचा व संस्थानचा शेवटचा सैनिक असेपर्यंत भारताशी लढण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थानचा प्रधान मीर मीर लायकअली याने वॉल्टर मॉक्टन यांस सांगितले. मॉक्टन रागाने थरथरतच मीर लायक अलीला म्हणाला, भारताचे सैन्य संस्थानात घुसल्यानंतर पाकिस्तानच्या कराचीत पळून जाणारे तुम्ही पहिले असाल. असे रागाने बोलत तो तिथून निघून गेला. 


निजामाने त्या मैत्री करारावर सही न केल्याचे वृत्त माऊंबॅटनना समजले व अत्यंत निराशेने ते म्हणाले की, आता हैदराबाद संस्थानवर भारतीय सैन्य पाठविण्यापासून सरदार पटेलांना कोणीही रोखू शकणार नाही आणि झालेही तसेच. सरदार पटेलांनी त्यावेळच्या भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल बुचर (ते इंग्रज अधिकारी होते.) यांना हैदराबाद संस्थानात सैन्य घुसविण्याचे आदेश दिले. परंतु त्यांस तसे करायचे नव्हते. त्यांनी सरदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सरदारांचा निर्धार कायम होता. त्यानंतर जनरल बुचरने पंडित नेहरूंशी संपर्क साधून कोणत्याही परिस्थितीत संस्थानवर सैन्य पाठवू नये असे सुचविले. पंडित नेहरुंनी 12 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर सरदारांना टेलिफोन करुन उठविले व त्यांना सैन्य कार्यवाही थांबविण्याची किंवा किमान लांववण्याची सूचना केली. परंतु सरदारांनी आता ते शक्य नाही असे सांगितले. इकडे ‘ऑपरेशन पोलो’ या सांकेतिक नांवाने जयंत नाथ चौधरी या लष्करी अधिकार्याच्या नेतृत्वाखाली 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटेच भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या चारही दिशेने संस्थानात घुसले. संस्थानच्या सैनिकांनी व रझाकारांनी भारतीय सैन्याला जुजबी विरोध केला. भारतीय सैन्य 17 सप्टेंबरला सकाळी राजधानी हैदराबादमध्ये घुसले. तात्काळ संस्थानचा सेनापती एल. इद्रिस याने पांढरे निशाण दाखवत भारतीय सेनाधिकारी जे.एन. चौधरी यांच्यापुढे शरणागती पत्करली. त्याचप्रकारे संस्थानचे पंतप्रधान व सर्व मंत्रिमंडळानेही शरणागती स्वीकारली. अशाप्रकारे हैदराबाद संस्थानचे भारतीय संघराज्यात पूर्णपणे विलिनीकरण करण्यात आले. भारताची एकात्मता व अखंडता अक्षौण राखण्याचे भव्य-दिव्य काम सरदार पटेलांनी पूर्ण केले, त्याबद्दल भारतीय जनता सरदार पटेलांची सदैव ऋणी आहे.