मुंबई : कोरोनाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी 9 वाजता 9 मिनिटे लाईट बंद करून दिवे लावा असं आवाहन केलं आहे. मात्र हाताला सॅनिटायजर लावून दिवे व मेणबत्ती लावू नका, असं आवाहन ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे. सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सॅनिटायजर लावून दिवे लावू नका, सावधगिरी बाळगा असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.


एकाचवेळी सर्वत्र लाईट बंद केल्यास देश अंधारात बुडण्याचा धोका आहे. तर दुसरीकडे अतिउत्साहाच्या भरात जनतेच्या जीवाशी खेळ होऊ घातला आहे, अशी टीका देखील डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. त्यामुळे राऊत यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, जनतेने लॉकडाउनचे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवावे, गर्दी करू नये. कोणत्याही परिस्थितीत उत्सवाचे स्वरूप येणार नाही याची दक्षता घ्यावी.


लाईट बंद न करता दिवे लावा - नितीन राऊत


जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होईल. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे जनरेशन आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बिघडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास आणि कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा काळजीपूर्वक विचार जनतेने करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय आवाहन केलं?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की 5 एप्रिलला आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले.


संबंधित बातम्या






Coronavirus | राज्यात 9 मिनिटं वीज बंद केल्याने तांत्रिक बिघाड होणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे