अकोला : अकोल्यातील सिव्हील लाईन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनातील वातावरण संवेदनेनं पार भारून गेलं होतं. दिवाळीच्या आनंदाला संवेदना आणि काहीशा आनंदाची झालर लाभलेली हा कार्यक्रम. कार्यक्रमात उपस्थित असलेली 'ती' आठ कुटुंब आयुष्याला नवा आधार आणि उभारी देणारी मदत मिळणार असल्यानं भविष्याप्रती काहीशी आश्वस्त झालेली. कार्यक्रमाचं स्वरूपही अगदी कौटुंबिक असंच. कार्यक्रमाच्या शेवटी 'त्या' आठ जणींच्या उसवलेल्या जगण्याला संवेदनेचे टाके भरण्याचा 'तो' क्षण आला. त्यांना जगण्याच्या संघर्षासाठी पीठ गिरणी, शिलाई मशीनच्या स्वरूपातील स्वाभिमानाचं शस्त्र भेट देण्यात आलं. हळूच या आठही माय-माऊल्यांचं मन भरून आलं अन् नकळत डोळ्यांत अश्रूंचे ढग दाटून आलेत. हे हृदयस्पर्शी चित्र होतं. रविवारी 15 नोव्हेंबर रोजी अकोल्यात 'जागर फाऊंडेशन'नं आयोजित केलेल्या 'निराधारांच्या दिवाळी कार्यक्रमातील.


अकोल्यातील 'जागर फाऊंडेशन' या नागरिकांच्या सेवाभावी संघटनेनं आज गरीब, विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सात महिलांना पीठ गिरणी आणि एका महिलेला शिलाई मशीन देत निराधार कुटुंबांना दिवाळीचा अनोखा आनंद बहाल केला. ही मदतही दिल्या गेली रद्दीसारख्या अडगळीतून जमा पैशांतून. या पैशांतून आठ निराधार कुटुंबांना पीठ गिरणी आणि शिलाई मशिन देण्यात आली. समाजाकडून जमा केलेल्या 17 टन रद्दीतून ही मदत उभारली गेली. तीन राज्यांतील 20 जिल्ह्यांतून ही 17 टन रद्दी जमा करण्यात आली. आज या मदतीतून आठ कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून देण्यात आलं.


'रद्दी'तून समाजाला मदतीचा अनोखा 'जागर'


'जागर फाऊंडेशन' ही समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संवेदनशील आणि धडपड्या लोकांचं अस्सल सामाजिक संघटन. निरंतर समाजासाठी विविध सामाजिक उपक्रमांतून झटणाऱ्या जागर फाऊंडेशननं हे काम करतांना प्रसिद्धीची हाव कधीच धरली नाही. हा उपक्रमांतून 'जागर परिवारा'नं सेवेचा नवा आदर्श पायंडा पाडून दिला. 'रद्दी'तून निराधारांची दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम 'जागर'नं आठ वर्षांपासून सुरु केलं. सुरुवातीला काही किलोंमध्ये होणारं संकलन यावर्षी तब्बल 17 टनांवर पोहोचलं. दिवाळीत घराची साफसफाई करतांना रद्दी ही हमखास निघतेच. 'जागर'नं आठ वर्षांपूर्वी समाजाला रद्दी देण्याचं आवाहन केलं. अन् रद्दीतून दरवर्षी समाजातील गरजूंची दिवाळी साजरी होऊ लागली. अन् रद्दीची अडगळ निराधारांच्या चेहऱ्यावरच्या या आनंदानं समृद्ध होऊन गेली.


यावर्षी महाराष्ट्रासह इतर दोन राज्यांतून झालं 'रद्दी संकलन' 


दरवर्षी दिवाळीच्यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतून रद्दी संकलनासाठी जनतेला आवाहन करण्यात येतं. अनेक शाळांमधील विद्यार्थी, नागरिक या चळवळीत सहभागी होतात. 'जागर'चे स्वयंसेवक या शाळा आणि घरापर्यंत पोहोचत हे रद्दी संकलन करतात. या संकलनाची रद्दीची विक्री करून पैसा उभा केला जातो. आणि यातून गरजूंची निवड करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरूपी मदतीची वस्तू भेट दिली जाते. यावर्षी महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांसह गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यातूनही या उपक्रमाला मदत करण्यात आली. महाराष्ट्रातील अकोल्यासह बुलडाण, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव, परभणी, पालघर, सातारा, अहमदनगर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांतून हे रद्दी संकलन झालं. यासोबतच गुजरातमधील अहमदाबाद आणि उत्तरप्रदेशातील अंबाला येथूनही यावर्षी मदत झाली.


यांना केली मदत 


आज या कार्यक्रमात सात महिलांना पीठ गिरणी देण्यात आली. तर एका महिलेला शिलाई मशिन देण्यात आली. यातील प्रत्येकीची संघर्षकथा अक्षरश: हृदयाला पाझर फोडणारी आहे. या संघर्षाच्या आभाळाला 'जागर'नं संवेदनेचे टाके भरले आहेत. पीठ गिरणी देण्यात आलेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील अंबिकापूरच्या वर्षा राऊत, पातूर तालूक्यातील गावंडगावच्या कविता चव्हाण, बार्शीटाकळी तालूक्यातील जनूनाच्या प्रांजली राजवाडे, बाळापूर तालूक्यातील हिंगणा निंबा येथील पुजा तायडे, टाकळीखुर्द येथील सविता आढे, मुर्तिजापूर तालूक्यातील शिवण खुर्दच्या मंगला बोकडे, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालूक्यातील जयपूर कोथळीच्या अर्चना देशमुख यांचा समावेश आहे. तर तेल्हारा तालूक्यातील करी रूपागड शिवाणी भारसाकळे यांना शिवणयंत्र देण्यात आले.


पाहा व्हिडीओ : शब्दसुरांचा श्रवणीय फराळ, लोकगायक नंदेश उमप अन् गायिका कविता राम यांच्यासोबत



'लोकजागर फाऊंडेशन'च्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम सुरु


'जागर फाऊंडेशन'नं जिल्ह्यातील गावांमध्ये गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत पाणी फाऊंडेशनच्या 'वॉटर कप' स्पर्धेत सहभाग घेतला. गावामध्ये जलसंधारणाच्या कामाचा जागर करीत आभाळभर काम उभं केलं गेलं. यातूनच 'वॉटर कप' स्पर्धेत करी रूपागड तालूक्यातून पहिलं आलं. पुढे गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त शेकडो पालख्या शेगावला जात होत्या. या पालख्या गेल्यानंतर पालखीमार्गाची स्वच्छता मोहीम हाती घेणारं 'माझी वारी, स्वच्छ वारी अभियाना'तही त्यांनी विद्यार्थ्यांसह प्रत्येकवर्षी सक्रीय सहभाग नोंदवलाय. सोबतच दिवाळीत आदिवासींना कपडे आणि फराळ वाटपाचा कार्यक्रमही 'लोकजागर फाऊंडेशन'च्या माध्यमातून होत असतो. जिल्ह्यात पुनर्वसीत काही आदिवासी गावांमध्ये सध्या शाळेची व्यवस्था झालेली नाही. शिक्षणाची सोय नसलेल्या 'नई तलाई' या गावात 'जागर फाऊंडेशन'नं एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांनी येथील पहिली दुसरीत जाण्याच्या वयातील विद्यार्थ्यांना कोरकू भाषेत भाषांतरीत केलेली 'बालस्नेही' पुस्तके वितरीत केलीत. तसेच मागच्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बैल पुरामुळे मरण पावलेत. शेती कशी कसावी याचा प्रश्न उभा राहिला. यावेळी 'जागर' परिवाराने लोकवर्गणीतून 100 बैल या भागातील शेतकऱ्यांना दिलेत.


'जागर परिवारा'नं सध्याच्या परिस्थितीत या कुटूंबांसाठी केलेली ही मदत अनेकांनी केलेल्या कोटी, लाखोंच्या तूलनेत अगदी छोटी असेलही. मात्र, ती आश्वासक आहे. समाजात सकारात्मक विचार, संवेदनशीलतेचं बीजारोपन करणारी आहे. 'जागर फाऊंडेशन' ही समाजातील संवेदनेची पुंजी आहे. त्यांच्यासाठी 'डॉक्‍टर प्रकाश बाबा आमटे' चित्रपटातील 'प्रार्थना' ही स्फूर्तीगीत आहे, तोच त्याच्या आयुष्याचा ध्यासही आहे. गुरू ठाकूर यांनी लिहिलेलं हे गीत मानवतेचं 'पसायदान' मागणारं आहे. या गीतात गुरू ठाकूर लिहितात की...


तू बुद्धि दे तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे…


हरवले आभाळ ज्यांचे
हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना
हो तयांचा सारथी
साधना करिती तुझीजे
नित्य तव सहवास दे…


जाणवाया दुर्बलांचे
दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा
रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरासया
खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस
आणि अर्थ या जगण्यास दे…


सन्मार्ग आणि सन्मती
लाभो सदा सत्संगती
नीती नाही भ्रष्ट हो
जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे
झेपावण्या आकाश दे…


महत्त्वाच्या बातम्या :