मुंबई : मुंबई शहरात बेदरकार मोटारसायकल चालविण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे.  अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी. दंड वाढीसह मोटारसायकल जप्तीची कारवाई करता येईल का याबाबत विचार करावा, असे निर्देश रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. तर खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही अधिक असून याप्रकरणी संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर किंवा टोलवसुली करणाऱ्या कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचनाही रावते यांनी यावेळी दिल्या आहेत.

मुंबई शहरात बेदरकार मोटारसायकल चालविण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मोटारसायकलींच्या शर्यती लावणे, सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात मोटारसायकल चालविणे आदी प्रकारही वाढले आहेत. अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी. दंड वाढीसह मोटारसायकल जप्तीची कारवाई करता येईल का याबाबत विचार करावा, असे निर्देश रावते यांनी दिले आहेत.

बेकायदेशीररित्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने रद्द
अवजड (ओव्हरलोड) वाहनांप्रमाणे ग्रामीण भागात मोजमापबाह्य (ओ.डी.सी.) वाहनांचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात अनेक ट्रक, ट्रॅक्टर हे ओव्हर डायमेंशनल प्रवास करताना आढळतात. यामुळेही अपघात होत असून या बाबीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. याशिवाय खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही अधिक असून याप्रकरणी संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर किंवा टोलवसुली करणाऱ्या कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना रावते यांनी यावेळी दिल्या आहेत.

प्रवासी वाहनांमधून टपावरुन किंवा डिक्कीमधून बेकायदेशीररित्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असेही मंत्री रावते यांनी सांगितले आहे.

विनाहेल्मेट वाहन चालकांवर कारवाई, 8 कोटी 32 लाख रुपयांची दंड वसुली 
राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात या कालावधीत 1 लाख 41 हजार 730 मोटारसायकल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन आयुक्तालयामार्फत देण्यात आली आहे.  राज्यात या प्रकरणांमध्ये 8 कोटी 32 लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

यासंदर्भात सूचना देताना रावते म्हणाले, विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचे प्रमाण वाढले हे स्वागतार्ह असले तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. शासनाने कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती केली नसून हेल्मेट वापराच्या नियमाची फक्त अंमलबजावणी केली जात आहे. हेल्मेटचा वापर करणे हे वाहन चालकांच्या जीवीतरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.

टायर तपासणीची यंत्रणा सुरु करा
मुंबई ते नागपूर दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजनांची अंमलबजावणी रस्ते बांधकामाच्या वेळीच होणे गरजेचे आहे. या महामार्गासाठी जी अधिकची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्यास अनुसरुन आपल्या वाहनांचे आणि त्यांच्या टायर्सचे डिझाईन आहे का याचा विचार व्हावा, अशी सूचना यावेळी परिवहन  रावते यांनी केली.

यासाठी वाहन उत्पादक आणि टायर उत्पादक कंपन्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करावी. राज्यात बरेच अपघात हे टायर फुटून किंवा ते पंक्चर झाल्याने होतात. त्यामुळे टायर तपासणीची काही यंत्रणा आपल्याकडे सुरु करता येईल का याचाही अभ्यास करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिली. निकामी किंवा गुळगुळीत टायरसह प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.