मुंबई : कालपासून 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. या प्रवेशासाठी प्रवेश अर्जामध्ये भाग- 1 हा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी भरावयाचा आहे. यामध्ये अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून घ्यायची आहे. त्यामध्ये दिलेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून या ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात करता येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, असे मुंबई शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले आहे.



नेमकी कशी असेल प्रवेश प्रक्रिया

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून माहिती अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका घेऊन त्यात दिलेल्या पासवर्ड आणि लॉग इन आयडीद्वारे mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करायचे आहे.

त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती रजिस्ट्रेशन फॉर्म भाग - 1 मध्ये टाईप करून ती सेव्ह करायची आहे. यानंतर ज्यावेळी दहावीचा एसएससी निकाल लागणार त्यानंतर या रजिस्ट्रेशन फॉर्म भाग 2 भरायचा आहे.

भाग 2 मध्ये दहावीचे मार्क्स त्यासोबतच जास्तीत जास्त दहा कॉलेजचे पसंती क्रमांक विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी द्यायचे आहेत.

प्रवेशाच्या पहिल्या फेरीत पहिल्या क्रमांकाचे कॉलेज विद्यार्थ्याला मिळाल्यावर त्याला ते घेणे बंधनकारक असणार आहे. बाकी विद्यार्थ्यांसाठी ते दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा कॉलेज पसंती क्रमांक देऊ शकतील.

हीच प्रक्रिया फेरी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी होईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसतील त्यांच्यासाठी तिसऱ्या फेरीनंतर स्पेशल फेरी घेण्यात येईल यामध्ये अल्पसंख्यांक कॉलेजच्या आरक्षित उरलेल्या जागा देखील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील.

यामध्ये विद्यार्थ्यांनी इंटेग्रेटेड कॉलेजला प्रवेश घेऊन नये, असे शिक्षण उपसंचालकांकडून सांगण्यात आलं आहे.