कोल्हापूर : राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी परवा जाहीर झाली. पण ही यादी महाविकासआघाडीतल्या अंतर्गत रस्सीखेचासाठी नवं कारण बनल्याचं समोर येत आहे. त्यातही कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरुन बरंच अंतर्गत राजकारण सुरू आहे. सरकार बनलं, शपथविधी झाला, त्यानंतर रखडलेलं खातेवाटपही झालं. खातेवाटपानंतरचे रुसवेफुगवे दूर झाले. यासर्व राजकीय नाट्यानंतर सरकार कामाला लागेल असं वाटत होतं. पण चित्र वेगळचं दिसत आहे. अजून एका गोष्टीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. ती गोष्ट म्हणजे, पालकमंत्रीपद. त्यातल्या त्यात कोल्हापूरचं मंत्रीपद कोणाकडे जाणार यावरून नवीन मुद्दा चर्चेत आला आहे. कारण एबीपी माझाशी बोलताना बाळासाबेह थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे.


पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांच्या नगरमध्ये राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचं नाव पालकमंत्री म्हणून देण्यात आलं होतं. तर हसन मुश्रीफांच्या कोल्हापुरात बाळासाहेब थोरात पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. अशी अदलाबदल कशासाठी करण्यात आली, याच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई सुरु असल्यामुळे त्यावर तोडगा म्हणून हा मार्ग काढल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ : कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्वीकारणार नाही : बाळासाहेब थोरात 



कोल्हापुरात तीन मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री तर काँग्रेस सतेज पाटील आणि शिवसेनेच्या कोट्यातून येड्रावकर असे दोन राज्यमंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर या सर्वच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे किमान कोल्हापुरात तरी आपला पालकमंत्री असावा यासाठी काँग्रेस आग्रही आहे. पण सतेज पाटलांची आक्रमक कार्यशैली राष्ट्रवादीला जिल्ह्यात अडसर ठरु शकते, या भीतीनं त्यांच्या नावाला मात्र विरोध सुरू आहे. जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री असताना राज्यमंत्र्याकडे पालकमंत्रीपद कसं हा युक्तीवाद त्यासाठी केला जात आहे.

पालकमंत्रीपद आपण स्वीकारणार नाही हे आता थोरातांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसमध्ये विश्वजीत कदम हे एकमेव मंत्री आहेत ज्यांच्याकडे पालकमंत्रीपद नाही. त्यामुळे थोरातांनी कोल्हापुरचा दावा सोडल्यानंतर तिथं कुणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोल्हापूर हा भाजप प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे. मात्र हाच जिल्हा भाजपमुक्त झाला आहे. त्यात सतेज पाटलांच्या 'आमचं ठरलंय' या पॅटर्नचाही बराच वाटा आहे. सतेज पाटील यांना सध्या भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आता थोरातांनी कोल्हापुरचं पालकमंत्रीपद सोडल्यानंतर ते सतेज पाटलाकंडे येणार की, राष्ट्रवादी पुन्हा हट्टानं कोल्हापूर मागून नगर काँग्रेससाठी सोडणार याची उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या : 

सतेज पाटीलच कोल्हापूरचे पालकमंत्री होणार?

तानाजी सावंत यांची नाराजी मिटेना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठवाड्याच्या बैठकीलाही दांडी