नवी दिल्ली : नवी दिल्ली : महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्वीकारणार नाहीत. "काँग्रेसचे 12 मंत्री मंत्रीमंडळात आहेत, 12 पालकमंत्रीपद मिळणार नसतील तर आमच्या सहकाऱ्यांना संधी देण्यासाठी मी पालकमंत्रीपद स्वीकारणार नाही, असं म्हटलेलं होतं, तीच भूमिका कायम आहे," असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. "मी प्रांताध्यक्ष आहे, मी मागे थांबेन, आमच्या सहकाऱ्यांपैकीच एक जण तिथे अॅडजस्ट होऊ शकतो," असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना हे पद मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.


कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काय आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, नगर, सोलापूर या सर्व जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्यात केवळ कोल्हापूर हा एकमेव जिल्हा काँग्रेसच्या वाट्याला आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, काँग्रेसचे सतेज पाटील, शिवसेनेच्या कोट्यातून अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर असे तीन मंत्री आहेत. पण यापैकी कुठल्याच स्थानिक नेत्याला हे पालकमंत्रीपद दिलं नाही. हसन मुश्रीफ यांना अहमदनगर तर बाळासाहेब थोरातांना कोल्हापूर अशी अदलाबदल करण्यात आली. सतेज पाटील यांना भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे ज्या अर्थी बाळासाहेब थोरात हे आता पालकमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, त्याअर्थी हे पद स्थानिक नेते सतेज पाटील यांना देऊन काँग्रेस जिल्ह्यात पक्ष मजबूतीची पावलं उचलू शकतं.

काँग्रेसच्या वाट्याला 36 पैकी 11 पालकमंत्रीपदं आली आहेत. विश्वजित कदम वगळता इतर मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळालं होतं. त्यामुळे आता विश्वजित कदम यांनाही कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळतं हे पाहावं लागेल.

पालकमंत्र्यांची यादी

1. पुणे- अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड - आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
8. पालघर- दादाजी दगडू भुसे
9. नाशिक-  छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
19. जालना-  राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली-  वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड-  धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा-  सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे