नवी दिल्ली : राज्यात खातेवाटप जाहीर झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून नाराज असलेले काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली भेटीत तातडीने सूत्रं हलवल्याने वडेट्टीवर यांच्या नाराजीचा प्रश्न मोडीत निघाला आहे. बाळासाहेब थोरात काल (9 जानेवारी) रात्री उशिरा बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले. काल आणि आज सकाळी त्यांनी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर फोनवरुन वडेट्टीवार यांचं पक्षश्रेष्ठींशी बोलणं करुन दिलं. त्यामुळे वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे.


बाळासाहेब थोरात यांच्या या दिल्ली भेटीचा परिणाम तात्काळ महाराष्ट्रातही दिसला. कारण या फोनवरच्या संवादानंतर विजय वडेट्टीवार यांनी लगेचच मदत आणि पुनर्वसन खात्याचा पदभारही स्वीकारला. विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या खात्यांमध्ये आधी भूकंप पुनर्वसन खातं होतं. तर शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे खातं होतं. पण आता त्यातलं मदत व पुनर्वसन हे खातं वडेट्टीवार यांच्याकडे असणार आहे. हे खातं एरव्ही महसूल खात्याशीच जोडलेलं असायचं. पण यावेळी ते स्वतंत्र करण्यात आलं आहे.

5 जानेवारीला खातेवाटपानंतर विजय वडेट्टीवार यांनी कुठल्याही प्रकारे माध्यमांना प्रतिक्रिया दिली नव्हती. अगदी मुंबईतील त्यांच्या बंगल्याचे दारं आणि खिडक्याही बंद करण्यात आल्या होत्या. पण पाच दिवस राजकीय विजनवासात गेलेले वडेट्टीवार आज खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांसमोर आले. "आपण नॉटरिचेबल नव्हतो. तर कौंटुबिक कारणांमुळे फोन स्वीकारु शकलो नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन महिन्या कुटुंबासाठी वेळ दिला नव्हता. त्यामुळे दोन दिवस कुटुंबासोबतच होतो. आजही मी दुपारी कुटुंबासोबत वेळ घालवणार आहेत. त्यानंतर सोमवारी कामाला सुरुवात करणार," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडलं. मात्र नाराजीमुळे विजय वडेट्टीवार यांनी दांडी मारल्याची चर्चा होती. परंतु "कौटुंबिक कारणामुळे मी अधिवेशनाला उपस्थित राहिलो नाही. याची कल्पना मी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दिली, त्यांच्या परवानगीनंतरच मी गैरहजर होतो, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.