सांगली : सांगली लोकसभा निवडणूक तीन तगड्या उमेदवारांमुळे गाजली होती. भाजपकडून संजय पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते. तिघांनी एकमेकांवर केलेल्या जहरी टीकेमुळे ती निवडणुक खूप चर्चिली गेली. आता देखील खासदार संजय पाटील यांनी कोरोनाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा फेल गेल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी, आयुक्त यांची बदली करावी अशी मागणी केली. या मागणीला भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांनी कडाडून विरोध करत खासदार संजय पाटील यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं आहे.
खासदार संजय पाटील यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) जिल्हा प्रशासनावर जोरदार टीका करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याने तातडीने त्यांची बदली करण्याची मागणी केली. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या. मात्र या वक्तव्याला भाजपचेच विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांनी विरोध करत अशा काळात अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करणे चूक असल्याचे म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यात आता सामुदायिक प्रसाराचे प्रमाण खूपच जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याने तातडीने त्यांची बदली करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून खासदार संजय पाटील यांनी केली आहे. तसेच सांगली जिल्यात कोविड-19 विषयक परिस्थितीचा अभ्यास, निरीक्षण आणि देखरेखीसाठी केंद्र सरकारच्या मार्फत पथक पाठवून येथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासंदर्भात उपाययोजनांबाबत स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावा अशी मागणीही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
मात्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार पाटील यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत अधिकाऱ्यांवर टीका करण्याची ही वेळ नसल्याचं म्हटलं. "आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. जिल्ह्याला चांगले अधिकारी मिळाले आहेत, माझा त्यांना पाठिंबा आहे. अधिकाऱ्यांवर टीका करण्याची ही वेळ नाही, ही वेळ बदली करण्याची नाही, असे करुन अधिकारी वर्गाचे खच्चीकरण करु नका. नवे अधिकारी आले तर परिस्थिती समजून घेण्यात त्यांचा वेळ जाईल. मी अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे," असे म्हणत पडळकर यांनी खासदार संजय पाटील चुकीची मागणी करत असल्याचे म्हटले.
दुसरीकडे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या भूमिकेवर आणि मागणीवर विशाल पाटील यांनीही जोरदार टीका केली. प्रशासकीय यंत्रणेला नावं ठेवण्यापेक्षा आणि अधिकाऱ्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा खासदारांनी स्वतः पुढे येऊन कोरोना रुग्णासाठी एखादे हॉस्पिटल उभारुन दाखवावे. कोरोनाच्या भीतीमुळे मागील चार महिन्यापासून खासदार घरी बसून राहिले होते. आता चार महिन्यांनंतर घराच्या बाहेर पडून फक्त राजकारणासाठी काहीतरी बोलायचे म्हणून खासदार हे जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या बदलीची मागणी करत आहेत. भाजपचे सरकार असताना पुराच्या वेळी जिल्हाधिकारी, आयुक्तांची बदली का केली नाही, त्यावेळी याच खासदारांनी जिल्हाधिकारी,आयुक्त चांगले आहेत असे म्हटले होते, याची आठवण देखील विशाल पाटील यांनी करुन दिली. केंद्रात भाजपचे सरकार आहे, मोठमोठ्या लोकांना तुम्ही पैसे वाटता, त्या लोकांकडून निधी आणून सांगलीत एखादा दवाखाना उभारावा, प्रशासन जितकं जमेल तितके करायला लागलंय दुसऱ्याला फक्त नावं ठेऊन गप्प बसण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत, लोकांची कामे कशी होतील हे पाहावे असे म्हणत विशाल पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना विरोध दर्शवला आहे.