सोलापूर : जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातला आहे. भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय. रोज कोरोनाबाधितांची वाढणाऱ्या संख्येमुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार होत आहे. मात्र यातच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील तितकेच जास्त आहे. रोज वाढणाऱ्या पॉझिटिव्ह आकड्यांमुळे जनसामान्यांमध्ये भिती निर्माण होत असताना निगेटिव्ह आकडे पुढे करत पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न सोलापुरातील तरुणांनी सुरु केलाय. या प्रयत्नांना आता राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. ही मोहिम फक्त सोशल मीडियावर पोस्ट करुन पॉझिटिव्हीटी निर्माण करण्यापुरती मर्यादित राहिली नाही. तर गरजुंना प्रत्यक्षात मदत देखील पोहोचवली जात आहे.


फेसबुकवरून किंवा सोशल मीडियातून बरेच समूह वेगवेगळ्या विषयात मोहिमा चालवल्या जातात यामध्ये काही हॅशटॅग अगदीच प्रसिद्ध होतात. त्यापैकीच सध्या सोशल मीडियावर चालणाऱ्या 'वी वील हेल्प' या ट्रेंडची चर्चा फारच जोरात सुरू आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाचीच संपूर्ण व्यवस्था मोडकळीस निघाल्याने या व्यवस्थेला पुन्हा पुर्ववत करण्यासाठी त्या त्या ठिकाणची सरकारे आणि स्वयंसेवी संस्था अहोरात्र झटत आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचं. सोलापुरातल्या बार्शीतील सचिन अतकरे आणि त्याच्या मित्रांनी फेसबुकवर चालवलेली मोहीम.


कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि पुढे तो वाढत गेला या लॉकडाऊनमुळे भल्या भल्यांची आर्थिक गणितं फिस्कटली त्यात सर्वसामान्य, मजूर, गरिब हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था तर वाईटाहून वाईट झाली. उपासमारीनं लोक मरु लागले आणि हेच कुठेतरी थांबावं यासाठी फेसबुकवरील तरूणांच्या माध्यमातून वी वील हेल्प (#WeWillHelp) हा हॅशटॅग चालवणारा समूह निर्माण झाला. सचिन अतकरे या युवकानं पुढाकार घेऊन हा ट्रेंड चालवला आहे. कोरनामुळे राज्यातील विस्थापितांची विदारक अवस्था पाहत असताना मन हेलावून टाकणारा एक फोटो सोशल मीडियावर झळकला. हा फोटो पाहून केवळ आकडेवारीतून पॉझिटिव्हिटी निर्माण न करता प्रत्यक्ष मदत करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्याची प्रतिक्रिया सचिन याने दिली.



सचिन अतकारे हा मुळचा बार्शीतील वैरागचा असून पुण्यात एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. लॉकडाऊनमुळे अन्य लोकांप्रमाणे सचिन देखील आपल्या गावी अडकून राहिला. वर्क फ्रॉम होम करत सचिनने गरजुंना मदत करण्यास सुरुवात केली. सचिनने पाच हजार रुपयांची मदत करुन फेसबुकवर इतरांनीही मदत करावी असे आवाहन केले आणि त्यातूनच मदतीचा ओघ सुरू झाला. हळूहळू ही मदत करणारांची संख्या वाढली, सर्वजण वी वील हेल्प चे स्टेटस फेसबुकवर ठेऊ लागले. उत्साहापोटी लोक विचारणा करू लागले की हे वी वील हेल्प नक्की काय आहे, तेंव्हा सचिनची टीम त्या व्यक्तीला या विषयाची माहिती सांगायची आणि तिथून पुढे फेसबुकवरील सर्वांपर्यंत हा विषय पोहोचला. आज हा समूह बऱ्याच कुटूंबांना मदत करतोय.



लाखो रुपये सध्या जमा होत आहेत .हे पैसे कसे आणि कोठे वापरले जाणार त्या प्लॅनविषयी ही टीम सर्वांसमोर लेखाजोखा ठेवत असल्याने लोकांचाही विश्वास या समूहावर वाढला आणि मदतीचा ओघही वाढला. या टीमकडून गरजू व्यक्तीची थ्री लेयर तपासणी केली जाते की खरंच संबंधीतांना गरज आहे काय. एकदा खात्री पटल्यानंतर त्या कुटूंबाला आवश्यक तेवढी मदत या समूहाकडून केली जाते. आजपर्यंत जवळपास या समूहाने चारशे ते साडेचारशे कुटूंबांना मदत केलीय. अगदी गडचिरोली पासून ते सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उत्तर महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी या समूहाकडून मदत केली जातेय.



हा समूह गरजू लोकांना पैसे न वाटता मिळालेल्या मदतीतून शक्यतो जीवनावश्यक वस्तू खरेदी करून पाठवल्या जातात जेणेकरून नेमकी जी मदत गरजूंना लागतेय तीच पोहोचवण्यात या समूहाला यश येत आहे. सचिननं सुरु केलेलं हे पहिलंच काम नाही. त्यानं याआधीही सोशल मीडियाचा वापर करुन अनेकांना मदत पोहोचवलीय. सांगली कोल्हापूर पूर असो, की पाणी फाऊंडेशनचं काम असो आपलं काम सांभाळून सचिन अशा समाजकार्यात पुढं असतो. त्याच्या या कामात आता सैराटमधला सल्या अर्थात अभिनेता अरबाज शेख देखील उतरला आहे. तो वी वील हेल्प म्हणत गरजूंना मदत पोहोचवण्याचं काम करतोय. त्यामुळे हे काम खरंच वाखाणण्याजोगं आहे. वी वील हेल्प सारखे अनेक लोक सध्या सोशल मीडियातून लोकांना मदतीचं आवाहन करण्याचं काम करत आहेत. फेसबुकमुळे लोकांना आपण मदतही करू शकतो उध्वस्त झालेली घरे-उध्वस्त झालेले संसार पुन्हा सुरू करू शकतो हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय.