पालघर : पालघर जिल्ह्याची कोरोना संक्रमण स्थिती गंभीर बनली असून शहरी भागाबरोबर ग्रामीणची स्थितीही चिंताजनक बनली आहे. तर जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि कैदेत असलेल्या आरोपीही कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली असून प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.


सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 2018 वर पोचला असून आत्ता पर्यंत 68 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर पालघर ग्रामीणचा आकडाही 434 वर पोचला असून आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1014 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी आलेल्या कोरोना अहवाल धक्कादायक आला असून पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 26 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. या मध्ये पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडातील 11 आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासना बरोबर जिल्हा प्रशासनही खडबडून जाग झालं आहे. वाडा पोलीस ठाण्याच्या कैदेत असलेल्या 17 आरोपींपैकी 11 जणांचे अहवाल प्राप्त मंगळवारी प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.अजूनही 6 जणांचे अहवाल प्राप्त होणं बाकी आहे. सध्या न्यायालयाच्या परवानगीने या सर्वांना कॉरंन्टाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.


या नंतर पालघर जिल्हा प्रशासन खडबडून जाग झालं असून सध्या वाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्याचबरोबर या आरोपींच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाकडून चाचणी घेण्यात येत असून ह्या सर्वाना कॉरंन्टाईन करण्यात येणार आहे. तर वाडा पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालय दोन दिवसासाठी सील करणार येण्याची माहिती वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.


वाडा तालुक्यात 11,जव्हारमधील 12, डहाणू 1,पालघर 2 असे एकूण 26 रूग्ण आहेत. यात 3 महिला व 23 पुरुष आहेत. यामुळे पालघर जिल्ह्यातील एकूण संख्या सकाळपर्यंत 434 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या अगोदर वाडा पोलीस ठाण्यात पालघरमधील गडचिंचले येथील कथित तिहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला कोरोना लागण झाली होती. त्यावेळी आरोपीसह पोलीस कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेतली होती. हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. या प्रकारात वाडा तहसील कार्यालय दोन दिवस बंद ठेऊन त्याचा कारभार नजीकच्या प्रांत कार्यालय येथून चालेल, असे वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले. त्याच बरोबर काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील ब्ल्यू स्टार कंपनीत पालघर जिल्ह्याबाहेरील एक कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे .त्याच्या संपर्कातील 11 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.


Palghar Lynching | पालघर हत्याकांड प्रकरणी सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस