Beed News Update : मशिदीवरील भोंग्यांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभर वाद सुरू आहे. परंतु, बीडमध्ये या वादाला फाटा देत सामाजिक सलोखा जपण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जवळच्या पाटोदा गावातील हरिनाम सप्ताहामध्ये रोजा धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकाच मांडवाखाली हिंदुंसाठी प्रसाद तर मुस्लिम बांधवांसाठी रोजा सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक सलोखा जपणाऱ्या गावच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.   
 
पाटोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये समाप्ती दिवशी पवित्र रमजानच्या महिन्यात रोजा असणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करून धार्मिक विद्वेषाला गावकरी कधीच बळी पडणार नाही, असा संदेशच देण्यात आला आहे.  


पाटोदा गाव विधायक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. गेल्या 26 वर्षांपासून गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. राम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत सप्ताह उत्साहात संपन्न होत असतो. या सप्ताहात मुस्लिम बांधवांतर्फे नाश्ताची पंगत असते.  मुस्लिम बाधवही या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. शिवाय सप्ताहाच्या आजोनामध्येही मुस्लिम बांधवांकडून सहभाग घेतला जात असतो. गावाचा हा सप्ता दोन्ही समाजातील लोक एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. परंतु, यामुळे कायदा सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच पाटोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रमजानच्या रोजेदारांसाठी पंगतीचे आयोजन करून गावकऱ्यांनी सणसणीत चपराक देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे.  


महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी; केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?


कुणाला बाळासाहेबांची कॉपी करायचीय, स्पॉन्सरशिपचं राजकारण करायचंय त्यांना करु द्या : संजय राऊत


Raj Thackeray :  राज ठाकरे घेणार प्रभू श्रीरामांचे दर्शन; 5 जून रोजी अयोध्या दौरा