सांगली : सांगली इथल्या न्यायालयाने दिलेला आदेश न पाळल्याने न्यायालयाने कर्नाटक एसटी महामंडळला कारवाईचा झटका दिला आहे. या कारवाईत थेट सांगलीतील न्यायालयाने कर्नाटकची एसटी बस जप्तीची कारवाई केली आहे. एका अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना नऊ लाखांची नुकसान भरपाई द्या, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र कर्नाटक एसटी महामंडळाकडून या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे अखेर सांगली इथल्या न्यायालयाने आदेश न पाळल्याबद्दल कर्नाटकची एसटी बस जप्त केली. जिल्हा न्यायाधीश एम एम पाटील यांनी हा आदेश दिला होता. न्यायालयाचे हेड बेलीफ मुकुंद काटकर, आप्पासाहेब भोसले आणि फिरोजखान शेख यांनी KA-22-2311 ही बस जप्त केली. 


2015 मध्ये भानुदास बाबुराव भोसले (रा. किल्ला भाग मिरज) इचलकरंजी इथल्या पुलावरुन मोटर सायकलवरुन चालले होते. त्यांचा पुतण्या गाडी चालवत होता तर भानुदास भोसले पाठीमागे बसले होते. पाठीमागून येणाऱ्या कर्नाटक बस क्रमांक kA-42 F 594 या बसने ठोकल्यामुळे भानुदास भोसले जागीच मृत्युमुखी पडले तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी भानुदास भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांनी सांगली इथल्या न्यायालयात अॅड. आर एम भाले यांच्यामार्फत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. यावर सुनावणी होऊन भरपाईपोटी 8 लाख 33 हजार 563 रुपये कर्नाटक एसटी महामंडळाने विजया भोसले यांना देण्याचे आदेश 2016 मध्ये दिले होते. 


गेल्या सहा वर्षात या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे विजया भोसले यांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली. तेव्हा आदेशानंतरही भरपाईची रक्कम न दिल्याने अपघातातील बस किंवा कर्नाटक एसटी महामंडळाच्या मालकीची कोणतीही बस जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार कर्नाटक एसटी महामंडळाची बस जप्त करण्यात आली आहे. तसंच बसच्या चाव्या विजया भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या