मुंबई : आज 1 ऑगस्ट महसूल दिनाच्या निमित्ताने डिजिटल 8 अ सुविधेचा शुभारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. आतापर्यंत डिजिटल सातबारा उपलब्ध होता, मात्र त्याच्या जोडीने महत्त्वाचा असणारा 8 अ हा आत्तापर्यंत डिजिटली मिळत नव्हता. 8 अ च्या माध्यमातून एका कागदावर एका खाते धारकाचे संपूर्ण जमिनीचे विवरण असते. या सुविधेचा आज महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर शुभारंभ झला आहे.
8 अ हा सामान्य माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा दाखला असतो. सातबाराच्या जोडीने तो उद्यापासून डिजिटल मिळणार आहे. त्यामुळे तलाठ्याकडे जाऊन तो कागद काढण्यासाठी तासंतास तिष्ठत राहण्याची गरज राहणार नाही.
बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, शासकीय कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच या विभागाला प्रशासनाचा कणा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील असा विश्वास आहे.
गेला चार महिन्यापेक्षा अधिकचा काळ आपण सर्व कोविड- 19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करत आहोत. या काळात राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करत होती याचा मला अभिमान वाटतो. सर्वसाान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपवण्यात येतात. आजपर्यंत साडे सतरा लाखांहून अधिक लोकांनी 'डिजिटल 7/12' घेतला आहे त्याचप्रमाणे आता 'डिजिटल 8 अ' ला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.