सांगली : एकीकडे दूध दरावरून राज्यात आंदोलन पेटले असताना दुसरीकडे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात टोकाचे शाब्दिक युद्ध रंगले आहे. राजू शेट्टी म्हणजे काजू शेट्टी असून या भंपक माणसाला शेतकऱ्यांनी देवाला सोडलेल्या वळू सारखी अवस्था झाल्याची घणाघात टीका माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राज्य शेट्टी यांच्यावर केली आहे. तर खोत हे भ्रमिस्थासारखे बोलत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.


महायुतीच्या वतीने आज राज्यभर दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावरून माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माजी कृषिमंत्री कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शेट्टीं यांचा खरपूस समाचार घेतला आहे. "राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाली आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही. तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही.या उलट राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र अजूनही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही. कारण राजू शेट्टी जाईल तिथे खंजीर खुपसतात हे त्यांना माहित आहे", अशी टीका खोत यांनी केली आहे. तसेच मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमीन घेऊन ठेवली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे.


यावर राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच आंदोलन फसलं. त्यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळले आहेत. आंदोलन केंद्र सरकार विरोधात आहे की राज्य सरकार विरोधात की राजू शेट्टी यांच्या विरोधात आहे ते आधी ठरवा. प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आलेल्या अपयशाला कोणाला तरी जबाबदार धरण्यासाठी भ्रमिस्थासारख बोलले असावेत. माझी तीनशे एकर जमीन दाखवून द्या. ती विकून कडकनाथ मधील लोकांचे पैसे परत करतो.


आमदार भुयार म्हणतात, महाविकास आघाडीकडून मंत्रीपदाची ऑफर होती, पण... 


महाविकास आघाडीकडून मंत्रीपदाची ऑफर होती. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी संघटनेने काही भूमिका घेतली नाही. मंत्रिपद मिळालं असतं तर माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असता, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना म्हटलंय. ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी राजू शेट्टी आणि संघटनेने कुठलीही भूमिका घेतली नाही. अर्थात यामुळं मी राजू शेट्टी किंवा संघटनेवर आजिबात नाराज नाही, कारण शेवटी ती संघटनेची भूमिका आहे. मी शेवटपर्यंत माझा मतदारसंघ आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहील, असंही भुयार यांनी म्हटलंय. आज आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र भुयारांना मंत्रिपद मिळत असताना राजू शेट्टी यांनी मिळू दिलं नाही, असा आरोप केला आहे. त्यावर बोलताना भुयार यांनी ही प्रतिक्रिया दिली.


संबंधित बातम्या :