धुळे : कोरोना काळात मागील लॉकडाऊनमध्ये शहराच्या विविध भागात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या बांबूंचे धुळे महापालिकेने तब्बल 95 लाख रुपये बिल काढले आहे. हे बिल मंजुरीसाठी स्थायी समिती सभेत ठेवण्यात आले होते. मात्र, यातच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक असलेल्या शितल नवले यांनी केला आहे. यामुळे महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध सत्ताधारी पक्षातील नगरसेवकाने आवाज उठविल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मागील लॉकडाऊनच्या काळात शहराच्या विविध भागांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन महापालिकेने घोषित केले होते. यासाठी धनलक्ष्मी मंडप डेकोरेटर्सला ठेका देण्यात आला होता. मात्र, यासाठी लावण्यात आलेल्या बांबूंचे बिल तब्बल 95 लाख रुपये काढण्यात आले आहेत. प्रत्येकी 28 हजार 600 रुपये इतके बिल एका कंटेनमेंट झोनसाठी लावण्यात आले आहे. हे बिल स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असताना याला भाजपचे नगरसेवक शीतल नवले यांनीच विरोध केला आहे. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील शितल नवले यांनी केला आहे.
या बिलांची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शीतल नवले यांनी केली आहे. जळगाव महापालिके प्रमाणेच धुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आवाज उठविणार असल्याचे देखील भाजपचे नगरसेवक शीतल नवले यांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यात भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास आपण तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा नगरसेवक शीतल नवले यांनी दिला आहे.