Chhatrapati Sambhajinagar : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा (Reservation) मुद्दा तापला आहे. मराठा, ओबीसी, धनगर इत्यादि समजाकडून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन सरकारकडे या मागण्या लावून धरल्या जात आहे. अशातच सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी पुढे आली आहे. नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) फुलंब्री तालुक्यातील एकाच कुटुंबाने धनगड (Dhangad) जातीचे दाखले काढले होते. मात्र, राज्यात धनगड ही जातच अस्तित्वात नाही,असे वारंवार धनगर नेत्यांकडून सांगितले जात होते.


दरम्यान, आज सरकारने धनगड जातीचे काढलेल्या जातीचे दाखले आज रद्द केले आहे. एकच कुटुंबातील एकूण 6 जणांचे हे दाखले सरकारने रद्द केले आहे. तर आता धनगड जातीचे दाखले रद्द केल्याने धनगर जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आडवा येणारा महत्त्वाचा मुद्दा  निकालात निघाला असल्याची प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली आहे.


राज्यात धनगड अस्तित्वात नाही- गोपीचंद पडळकर


या विषयी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की,  महाराष्ट्रातील धनगर आरक्षणाच्या एसटी अमलबजावणी संदर्भातील लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे. हायकोर्टामध्ये या संदर्भात निकाल गेला त्यांचे कारण होतं, की आमचं म्हणणं आहे की राज्यात धनगड अस्तित्वात नाही. राज्य सरकारने  ऍफिडेव्हिटवर या संदर्भात लिहून दिलं होतं. परंतु छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथील बाबरा गावातील भाऊसाहेब खिलारे, रमेश खिलारे, कैलास खिलारे, मंगल खिलारे, सुभाष खिलारे, सुशील खिलारे यांनी धनगडाचे दाखले काढले होते. तसेच जात पडताळणी समितीने दाखला दिल्यानंतर  तो रद्द करण्याचा अधिकार त्यांना नव्हता.


मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार- गोपीचंद पडळकर


दरम्यान, या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात पडताळणी समितीला आदेशित केलं. या संदर्भात खोटे दाखले दिले आहेत, त्यांच्यावर तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, की ते बोगस आहेत. त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर येथे जात पडताळणी समितीने हे सहाच्या सहा दाखले रद्द केले आहेत. ते दाखले जप्त करून अवैध ठरवले आहे. सागर खिलारे यांचा दाखला चार दिवसापूर्वीच रद्द करण्यात आला आहे. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. यासंदर्भात  धनगर समितीचे कार्यकर्ते संभाजीनगर येथील जात पडताळणी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. त्यांचे हे यश आहे. त्याचेही मी आभार व्यक्त करतो. धनगर आरक्षणाची लढाई आपण आता टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत, याचा मनस्वी आनंद  राज्यातील धनगर जमातीला आहे. असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी या विषयावर भाष्य केले आहे.


 हे ही वाचा