Dhananjay Munde In Parbhani : सामाजिक न्याय मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कर्णबधिरांच्या या कार्यक्रमात स्वतःच्या भावाचा एक अत्यंत भावनिक अनुभव सांगितला. यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, माझा चुलत भाऊ हा दिव्यांग आहे. दहावीपर्यंत त्याचा मी सांभाळ केला, त्याचा सांभाळ कसा केला हे मला माहिती आहे.  त्यामुळे या कर्णबधिर, दिव्यांग यांचे दुःख मला माहिती आहे. म्हणून मी यांच्यासाठी काम करण्याचा चंग बांधला असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी मुंडे कमालीचे भावूक झाल्याचं दिसून आलं. 


परभणी जिल्ह्यातील कर्णबधिर व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि स्वरूप चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने 1 हजार जणांना मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी आणि वितरण शिबिराचे आयोजन शहरातील शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले आहे. पुढील 8 दिवस हे शिबिर सुरू राहणार असून आज याचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले.


यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी सुरू केलेले काम उल्लेखनीय आहे. अपंग असतील दिव्यांग असतील सर्वासाठीच धनंजय मुंडे खूप मोठं कार्य करत आहेत असं म्हणत त्यांनी कौतुक केलं.  धनंजय मुंडे यांनी आपण या कर्णबधिरांचा आवाज बनतोय हे आयुष्याला सार्थकी लागण्याचे काम असल्याचे सांगितले. तसेच लवकरच महाशरद नावाचे पोर्टल आपण सुरू करणार असून ज्यात सर्व दिव्यांगांची माहिती त्यात दिली जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने तिथं समाजातील सर्व दानशूरांना त्यांना मदत करता येणार आहे.


नुकताच परळीत निराधारांचा महामेळावा पार पडला होता. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मिशन वात्सल्य, संजय गांधी निराधारसह विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना लाभ वितरण आणि संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी या मेळाव्याला आलेल्या महिलांच्या पंगतीत स्वतः धनंजय मुंडे यांनी जेवायला वाढलं होतं.याचीही खूप चर्चा झाली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या