Prashna Maharashtrache : आज एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे कार्यक्रमात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी खास बातचित करण्यात आली. यावेळी त्यांनी शिक्षण शेत्रातील अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणानं बातचित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र बोर्ड दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बोर्डाचे निकाल येत्या 15 दिवसांत जाहीर करु असं ते म्हणाले. तसेच, निकाल उशीरा लागल्यामुळे त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु असंही ते म्हणाले आहेत.
दहावी, बारावीचा निकाल (10th & 12th Result) कधी लागणार? मे अखेरपर्यंत हा निकाल लागतो, पण यंदा काहीसा उशीर होणार आहे, त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीही उशीर होणार का? असा प्रश्न विचारल्यावर याबाबत बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं की, "दहावी, बारावीचे निकाल येत्या पंधरा दिवसांत जाहीर करु. जरी उशीर झाला, तरी दहावीनंतरची अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि बारावीनंरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु." तसेच, 20 जूनपर्यंत दहावी, बारावीचे निकाल जाहीर होतील का? असं विचारल्यावर "शक्यता आहे. मी निश्चितपणे सांगू शकत नाही. पण 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
"उशीर झाला तरी आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करु. कोरोना काळात काही गोष्टींची उणीव नक्की राहिली. पण तरिही देशाच्या एकंदरीत गुणवत्तेत महाराष्ट्र अव्वल आहे, ही महत्त्वाची बाब आहे. कोरोना काळातही शिक्षकांनी दुर्गम भागांमध्ये जात अनेक प्रयोग करुन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवलं." , असं बच्चू कडू म्हणाले.
महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल : बच्चू कडू
केंद्रीय शिक्षण खात्यानं 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. तसेच, शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घेऊ असं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर, शैक्षणिक विषमतेबाबत बोलताना शैक्षणिक विषमता अत्यंत घातक असून ती देशाला पोकळ करु शकते, असं बच्चू कडू म्हणाले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI